‘हर हर महादेव’च्या जयघोषात महाशिवरात्री साजरी

Mumbai

‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात शुक्रवारी संपूर्ण रायगड जिल्ह्यात महाशिवरात्री प्रचंड उत्साहात आणि तितक्याच भक्तीभावाने साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा यामुळे एकूणच वातावरण शिवमय झाले होते. ५९ वर्षांनी आलेल्या शश या विशेष योगामुळे शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रत्येक शिव मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून गर्दी झाली होती.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे श्री देव हरिहरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. दूरदूरच्या भाविकांनी तेथे हजेरी लावली. अलिबाग तालुक्यातील कनेकश्वर येथेही शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. नागोठणे येथील सीकेपी समाजाच्या पुरातन स्वयंभू शिवमंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली. माणगाव येथील सोमण गुरुजी यांच्या पौराहित्याखाली विवेक देशपांडे आणि वर्षा देशपांडे यांनी सपत्नीक लघुरूद्र केले. सायंकाळी श्री रामेश्वराची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. खारपाडा-कर्जत मार्गावरील आपटा येथील शिवमंदिरातही सकाळपासून शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील श्री क्षेत्र स्वयंभू महादेव मंदिरात शिवैक्य नथुराम हरलिंग जंगम यांच्या प्रेरणेने सुरू झालेला महाशिवरात्री उत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. नितीन आणि वैशाली जंगम यांच्या हस्ते रूद्राभिषेक करण्यात आला. याशिवाय अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. खालापूर तालुक्यातील चौक तुपगाव येथील पुरातन श्री धान्येश्वर मंदिरात पारंपारिक आणि भक्तीभावाने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. यानिमित्ताने येथे मोठी यात्रा भरत असते. महाशिवरात्रीनिमित्त खालापूर तालुक्यातील शिवमंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. प्राचीन सोमेश्वर शिवमंदिरात सकाळी काकड आरती, अभिषेक, पूजा डॉ. आठवले परिवाराच्या हस्ते झाली. हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. आसरोटी येथील शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीवर्धन तालुक्यातील देवखोल येथील पांडवकालीन श्री कुसुमेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव देवस्थान ट्रस्टच्यावतीने सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. दर्शनासाठी शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. ऐतिहासिक घारापुरी बेटावरील शिव मंदिरात दिवसभरात हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनाला येणार्‍यांसाठी, तसेच परतणार्‍यांसाठी जादा बोटींची व्यवस्था केल्याने दर्शनाचा सहज लाभ झाल्याची भावना अनेक शिवभक्तांनी बोलून दाखविली. मुरुड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथील शिवमंदिरात आणि टेकडीवर क्षेत्रपाल मंदिरात ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या गजरात शिवभक्त दर्शनासाठी पोहचले होते. ठिकठिकाणच्या मंदिरांत भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.