घरमहाराष्ट्रराज्य सरकार फक्त शरद पवारच पाडू शकतात

राज्य सरकार फक्त शरद पवारच पाडू शकतात

Subscribe

माजी आमदार अनिल गोटेंच्या पत्राने खळबळ

सत्ता गमावल्यामुळे भाजपच्या नेत्यांचे ताळतंत्र बिघडले आहे. काँग्रेस-शिवसेनेला एकत्र आणून शरद पवारांनी हे सरकार स्थापन केलेले आहे. त्यामुळे त्यांची इच्छा असेल तरच हे सरकार पडेल. अन्यथा सत्तेचा हा गोवर्धन तसूभर हलणार नाही. भाजपचे वाचाळ महाविकास आघाडीची एक विटही हलवू शकले नाही, असा दावा भाजपचे माजी नेते आणि सध्या राष्ट्रवादीत असलेले माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. तसे त्यांनी एक पत्रकच काढले आहे.

आमदार गोटे यांच्या या पत्रकामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोटे हे जरी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी ते शरद पवारांचे कट्टर विरोधक म्हणून आतापर्यंत ओळखले जात होते. शरद पवार हेच सरकार पाडू शकतात, या गोटेंच्या वक्तव्यामागील नेमका आशय काय, अशी चर्चेला आता सुरुवात झाली आहे. गोटे हे शरद पवार यांची खरंच प्रशंसा करताहेत की त्यातून त्यांना भविष्याचा वेध घ्यायचा आहे, असेही बोलले जाऊ लागले आहे.

- Advertisement -

अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपने आकाशपाताळ एक करून पंतप्रधानांसह सर्व नेत्यांच्या सभांचे आयोजन करुनही केवळ १०५ वर त्यांची गाडी अडकली. भाजपच्या एकाही नेत्याला कुणी गांभीर्याने घेत नाही. कहर म्हणजे भाजपकडून सरकार पाडण्याच्या तारखा देण्यात येतात. मात्र हे सरकार शरद पवारांच्या इच्छेशिवाय पडणार नाही. उलटपक्षी अकारण रोज उठून शासनावर टीका करायची आणि आघाडीच्या नेत्यांविरोधात बरळत राहायचे, अशा नियोजनशून्य राजकीय बालिशपणामुळे भाजपला कुणीही गांभीर्याने घेत नसल्याचा टोला गोटे यांनी या पत्रकातून लगावला आहे.

अनिल गोटे हे आपल्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रचलित आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यामुळे ते शरद पवार यांच्याविषयी कौतुकाचे दोन शब्द बोलत आहे का? अशी शंका घ्यायला जागा आहे. कारण भाजपमध्ये असताना देखील त्यांनी शरद पवारांविषयी असेच पत्रक काढले होते. असा नरपुंग गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही अशा आशयाच्या त्या पत्रात त्यांनी पवारांविरोधात जोरदार टीका केली होती. तसेच विधानसभेत देखील अनेकदा ते राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भिडायचे. मात्र आता राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांनी पक्षाशी जुळवून घेतल्याचे दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -