घरमहाराष्ट्र१ फेब्रुवारीपासून लाईटबिलावर मीटरचा फोटो येणार नाही!

१ फेब्रुवारीपासून लाईटबिलावर मीटरचा फोटो येणार नाही!

Subscribe

तुमच्या घरी येणाऱ्या लाईट बिलावर आत्तापर्यंत छापून येणारा मीटर रीडिंगचा फोटो आता येत्या १ फेब्रुवारीपासून गायब होणार आहे. कारण महावितरणने हा फोटो काढण्याचा निर्णय घेतला आहे.

महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा देखील महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने दि. १ फेब्रुवारी पासून वीजबिलावरील मीटर रिडींगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजबिलाबाबतची तसेच इतर महत्वाची माहिती मिळविण्यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाईल नंबर रजिस्टर केलात का?

वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रीडिंगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात महावितरणने सर्वप्रथम वीजबिलावर मीटर रीडिंगचा फोटो छापण्याची पद्धत सुरू केली होती. या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता. मात्र यात बील तयार झाल्यानंतर ग्राहकांना मीटरच्या रीडिंगचा फोटो उपलब्ध होत होता. परंतु आता महावितरण कंपनीकडून ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. त्यामुळे मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजबील मिळण्यापूर्वीच मीटर रीडिंग घेताच त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रीडिंग पडताळणीसाठी उपलब्ध राहील. तसेच मीटर रीडिंगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरूस्त करता येणे शक्य होईल.

- Advertisement -
Mahavitaran

कसा कराल मोबाईल नंबर रजिस्टर?

फोटो मीटर रीडिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्राहकांना चालू महिन्यातील मीटरचा फोटो पाहण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर सुविधा उपलबध करून देण्यात येईल. तसेच मीटरचा फोटो न छापल्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागेवर ग्राहकांना वीजबिलासंबंधी पूरक माहिती देण्यात येईल. महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर MREG(स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय आठवड्याचे ७ दिवस आणि दिवसाचे २४ तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत.


हेही वाचा – महावितरण व्हाट्सअँपद्वारे ग्राहकांशी ठेवणार संपर्क!

याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. सर्व वर्गवारीतील सुमारे २ कोटी ७ लाखांपेक्षा अधिक वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. ‘उर्वरित वीजग्राहकांनीही महावितरणच्या वीजसेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी’, असे आवाहन महावितरणने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -