‘राहुल आणि सोनिया गांधी तयार नाहीत; शरद पवारांनाच काँग्रेसचे अध्यक्ष करा’

sharad pawar congress president
'काँग्रेसचे अध्यक्षपद आता शरद पवारांना द्या'

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन चाललेल्या राजकारणाला आता काँग्रेसजनच कंटाळलेले असतील. मात्र काँग्रेसच्या बाहेर असणाऱ्यांना या विषयाचा कधीही कंटाळा येत नाही. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत नव्या – जुन्यांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर अनेक पक्षांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत भाष्य केले होते. त्यात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची देखील भर पडली आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद आता शरद पवार यांनी द्यावे, असा सल्लाच आठवले यांनी दिला आहे.

रामदास आठवले यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्विकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा”

काँग्रेस वर्किंग कमिटीची काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली होती. या बैठकीत काँग्रेसच्या २३ नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्राचा मुद्दा गाजला. काँग्रेसला स्थायी स्वरुपाचा आणि गांधी परिवाराच्या बाहेरचा अध्यक्ष मिळावा, असा सूर या पत्राच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला होता. मात्र अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावरच नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात यावी, असेही सांगितले होते. मात्र राहुल गांधी यांनी हे पत्र लिहिणारे नेते भाजपशी मिळालेले असल्याचा आरोप केला. त्यानंतर बैठकीत वादळ निर्माण झाले होते. कोणताही तोडगा न निघता पुन्हा सहा महिन्यांसाठी सोनिया गांधी यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद देण्यात आले होते.