पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकराचे प्रेयसीवर धारदारशस्त्राने वार

प्रेमवेड्या तरुणाने २१ वर्षीय प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

Pune
murder
तरुणीवर प्राणघातक हल्ला

पिंपरीचिंचवडमध्ये भर चौकात प्रेमवेड्या तरुणाने २१ वर्षीय प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रियकर विकास शांताराम शेटे (२३) याला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विकास हा प्रेयसिकडे वारंवार विवाहासाठी तगादा लावत होता. याच वादातून त्याने वार केल्याचे सांगण्यात येत असून तिचा विवाह दुसरीकडे जमल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी प्रेयसीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय प्रेयसी डांगे चौकातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करते. आज सकाळी दहाच्या सुमारास प्रेयसी नोकरीवर जात होती. तेव्हा, मागावर असलेल्या विकास शांताराम शेटे याने तिच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले, यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रियकर विकास हा प्रेयसिकडे विवाह करण्यासाठी तगादा लावत होता. त्यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. त्यामुळेच प्रेयसीने विकासला ब्लॉक केले होते. ती विकासला टाळण्याचा प्रयत्न करत होती. प्रेमवेड्या विकासने तिचा पाठलाग केला आणि आज सकाळी डांगे चौक येथे प्रेयसीवर पाठीमागून धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली असून विकासला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जखमी तरुणीचा दुसरीकडे विवाह जुळलेला असल्याचे पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळत आहे.


हेही वाचा – बीडमध्येही ‘सैराट’

हेही वाचा – पैशाच्या वादातून महिलेची गळा चिरुन हत्या