घरमहाराष्ट्रसंभाजी भिडे यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळं

संभाजी भिडे यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळं

Subscribe

मनुस्मृतीचे रचेते मनु हे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याही पेक्षा श्रेष्ठ असल्याचे संभाजी भिडे यांनी सुचित केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतात. आता पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धर्माचार्य साध्य कसा होईल ते ज्ञानोबा, तुकोबा आणि सगळ्या संत परंपरेने, ऋषीमुनींनी आणि तपस्वी लोकांनी आपल्याला शिकवले आहे. मात्र मनू त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे होते, असे वक्तव्य करत भिडे यांनी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांना मनूपेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. भिडे गुरुजीं हे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी जंगली महाराज मंदिरात आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भिडे यांनी हे बेताल वक्तव्य केले आहे.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी जंगली महाराज मंदिरात सर्व धारकऱ्यांसमोर आपले विचार प्रकट केले. “धर्माचाराच्या माध्यमातून आपल्या मनाला कुत्र्यासारखे बांधून ठेवले पाहीजे, मनावर विजय मिळवता आला पाहीजे. त्यासाठी धर्माचार साध्य करायला हवा. धर्माचार कसा करावा हे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि सर्व तपस्वींनी आपल्याला शिकवले आहे. आत्मोद्धार प्राप्त करण्याबद्दल मनू त्यांच्यापुढेही एक पाऊल आहे”, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.

- Advertisement -

मनुस्मृतीचे निर्माते मनू

मनुस्मृतीने वर्णव्यवस्थेचे समर्थन केले होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करुन मनुची व्यवस्था नाकारली होती. आतापर्यंत अनेक संतानीही सामाजिक समतेचा पुरस्कार करुन एकप्रकारे मनुच्या विचारांना तिलांजलीच दिली होती. भारतात मनुस्मृतीचे नाही तर संविधानाचे राज्य आहे. संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचे समर्थन केल्यामुळे आता पुन्हा एकदा या विषयावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -