माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश; जयंत पाटील म्हणतात ‘दर आठवड्याला इनकमिंग होणार’

Ex MLA joins NCP
माजी आमदार सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनपेक्षितपणे सत्तेत आल्यामुळे आता पक्षात पुन्हा इनकमिंगचे वारे वाहू लागले आहेत. दर आठवड्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नेते पक्षाच्या मुंबईतील कार्यालयाचे खेटे मारत असून आता दर आठवड्याला पक्षात इनकमिंग होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. आज परभणी जिल्ह्यातील माजी आमदार सिताराम घनदाट यांनी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “आता हळुहळु दर आठवड्याला पक्षात नवीन लोकांचा प्रवेश होत राहिल.”

गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य परभणी आणि अभ्युदय बँकचे संचालक भरत घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आमदार बाबाजानी दुर्राणी आणि परभणी जिल्ह्यातील माजी आमदार विजय भांबळे आदी उपस्थित होते.

सीताराम घनदाट हे सहकार क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. घनदाट यांनी अभ्युदय बँकेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आहे. सीताराम घनदाट हे गंगाखेड मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र २०१४ आणि २०१९ साली त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. घनदाट यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीचे गंगाखेडचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांची मात्र अडचण झाली आहे. कारण २०१४ साली गंगाखेडची उमेदवारीसाठी आता स्पर्धा निर्माण होऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्याच आठवड्यात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी प्रवेश केला होता. ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते विजय पाटकर, लेखक आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांच्यासहीत अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याआधी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी रुही बेर्डे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.