पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाच्या पक्षाची स्थापना

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी मराठा क्रांती सेना या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे. मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

Satara
Rally for Demand Maratha Reservation
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा मोर्चा (फाईल फोटो)

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एक झालेल्या मराठा समाजामधून आता एका नव्या पक्षाची स्थापना होणार आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर या पक्षाची स्थापना होणार असून महाराष्ट्र क्रांती सेना असं या पक्षाचं नाव आहे. साताऱ्यात रायरेश्वरध्ये या पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. मराठा समाजाचे सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्यातच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पक्ष स्थापनेसंदर्भात मराठा समाजाचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात ठरल्यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर हा पक्ष स्थापन होत असल्याचे सुरेश पाटील यांनी जाहीर केले आहे.

मराठ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही हा पक्ष स्थापन केला आहे. काही लोक फक्त विरोध करत आहेत. मात्र, मराठा समाज आमच्यासोबत उभा राहील. आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या देखील जागा लढणार आहोत. उदयनराजेंनी आमच्या पक्षाला पाठिंबा दिला असला, तरी ते आमच्यासोबत येतील की नाही, याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही.

सुरेश पाटील, अध्यक्ष, मराठा आरक्षण संघर्ष समिती

इतर गटांकडून विरोध

दरम्यान, मराठा समाजामध्येच मागण्यांसंदर्भात किंवा आंदोलनाच्या पद्धतीसंदर्भात फूट पडल्याचं अनेकदा समोर आलं आहे. याच मुद्द्यावरून मराठा समाज आंदोलनामध्ये अनेक गट देखील पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरेश पाटील यांनी जाहीर केलेल्या मराठा पक्ष स्थापनेच्या घोषणेवरही मराठा समाजातील इतर घटकांकडून टीका केली जात आहे.

महाराष्ट्र क्रांती सेनेशी मराठा क्रांती मोर्चाचा काडीमात्र संबंध नाही. सुरेश पाटील यांचा हा तिसरा पक्ष आहे. ते दरवर्षी पक्ष काढतात. त्यामुळे हा त्यांनी खेळलेला जुगार आहे.

भैयासाहेब पाटील, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

सुरेश पाटील हे भाजपशी संबंधित होते. त्यानंतर त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या पक्षात उडी मारली आणि आता त्यांनी हा तिसरा पक्ष काढून शेवटचा जुगार खेळल्याची टीका देखील भैय्यासाहेब पाटील यांनी केली आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – मराठा मोर्चा; दिलेला शब्द पाळा, नाहीतर सत्तेची मस्ती उतरवू

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here