कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक; आजपासून मुंबई, पुण्याचा दूध पुरवठा रोखणार

Maratha Reservation, Maratha Sakal Samaj will stop milk supply to Mumbai Pune from kolhapur

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) स्थगितीचे निर्देश दिल्यानंतर राज्यातील नोकर भरती थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष करत पोलीस भरतीचा निर्णय घेतल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. आजपासून मुंबई आणि पुण्याला कोल्हापुरातून होणार दुध पुरवठा रोखण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती दिली. न्यायालयाच्या या आदेशानंतर पुढील न्यायालयीन आदेश येईपर्यंत राज्य सरकारने राज्यातील नोकर भरती थांबवावी, विद्यार्थ्यांना ज्या सवलती देण्यात येत आहेत त्या सुरु ठेवाव्यात शिवाय मराठा आरक्षणाबाबत तीन दिवसात निर्णय जाहीर करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने चार दिवसांपूर्वी केली होती. सरकारला बुधवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, उलट पोलीस भरतीचा निर्णय जाहीर केला. यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांत निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी मराठा आरक्षणावर चर्चा केली. बैठकीनंतर बोलताना दोन ते तीन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी सरकारसोबत विरोधी पक्ष एकत्र असल्याचा खास उल्लेख केला. कायदेशीर बाबींसाठी विधी तज्ज्ञ यांची मदत घेतली जाईल. त्यांच्या सल्ल्यानंतर पुन्हा एकदा कोर्टात दाद मागण्यात येईल. हायकोर्टात मराठा आरक्षणाला विजय मिळवून देणारी विधी तज्ज्ञ यांची टीम पुन्हा एकदा मदतीला घेऊन कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी पुढची लढाई लढली जाईल. ही लढाई कधी करायची आणि मराठा समाजाच्या तरुणांच्या नोकर्‍या आणि शिक्षणात आरक्षण कसं टिकून राहील, यासाठी पावले उचलली जातील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.