घरमहाराष्ट्रनयनतारा सहगल प्रकरण : साहित्यिकांचा निमंत्रण वापसीचा सूर

नयनतारा सहगल प्रकरण : साहित्यिकांचा निमंत्रण वापसीचा सूर

Subscribe

ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी रद्द केल्यामुळे महाराष्ट्राचे मराठी साहित्यिक नाराज झाले आहेत. नयनतारा यांचे निमंत्रण रद्द केल्यामुळे महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांनी संमेलनाचे निमंत्रण वापसी करण्यास सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले होते. नयनतारा यांनी आपले भाषण संमेलन आयोजकांना पाठविल्यानंतर रविवारी आयोजकांनी नयनतारा यांचे साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द केले. नयनतारा या संमेलनाचे उद्घाटन करणार होत्या. परंतु, आयोजकांकडून त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या साहित्य आणि राजकीय विश्वावर पडताना दिसत आहे. नयनतारा यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांनी संमेलनाचे निमंत्रण वापसी करण्यास सुरुवात केली आहे. याविषयी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मराठी साहित्यिक आणि जनतेने यवतमाळ साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकावा असे म्हटले आहे.

हेही वाचा – नयनतारा यांना आमचा विरोध नाही – राज ठाकरे

- Advertisement -

साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकावा – डॉ. भालचंद्र मुणगेकर

याविषयावर ज्येष्ठ लेखक डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ख्यातनाम साहित्यिका नयनतारा सेहगल यांना यवतमाळ येथील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निमंत्रित केल्यानंतर केवळ त्या इंग्रजी भाषिक साहित्यिका असल्याचे भंपक कारण देऊन त्यांना उद्घाटनपद नाकारणे, ही बाब निषेधार्ह आहे. त्यामागचे खरे कारण अर्थातच एक संवेदनशील साहित्यिका म्हणून त्यांनी लिखित उद्घाटनपर भाषणात नमूद केल्याप्रमाणे देशातील वाढत्या असहिष्णुवरचे त्यांचे भाष्य हे आहे. ही वैचारिक स्वातंत्र्याची गळचेपी आहेच, परंतु तमाम साहित्यविश्वाचा उपमर्द आहे. अर्थात, हा निर्णय संमेलनाच्या कणाहीन संयोजकांचा नसून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या दबावाचा तो परिणाम आहे. काही दिवसांपुर्वी अशाच दबावामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने, दहा दिवसांवर येऊन ठेपले असताना, सुमारे वर्षभर तयारी केलेली आणि एक हजार प्रतिनिधींनी नोंदणी केलेली ‘अखिल भारतीय ऐतिहासिक परिषद’ कोणतेही कारण न देता रद्द केली. राज्यघटनादत्त व्यक्ती-स्वातंत्र्याची गळचेपी करणारी विद्यमान सत्ताधाऱ्यांची मग्रूरी ठेचून काढण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे, श्रीमती सेहगल यांची माफी मागून संयोजकांनी त्यांना उद्घाटक म्हणून पुन्हा न बोलविल्यास समस्त मराठी साहित्यिक व जनतेने यवतमाळ साहित्य संमेलनावर बहिष्कार घालावा. तसे न झाल्यास, भारतातील उदारमतवादाचे जनक व मराठी साहित्य संमेलनाचे शिल्पकार न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याशी प्रतारणा केल्यासारखे होईल आणि साहित्यिक प्रतिभाही अर्थशून्य होईल”.

हेही वाचा – निमंत्रण रद्द करणे, ही एक लाजिरवाणी बाब – नयनतारा सहगल

- Advertisement -

माझेही निमंत्रण रद्द करावे – ज्ञानेश महाराव

ज्येष्ठ लेखक ज्ञानेश महाराव यांनी देखील या घटनेचा विरोध केला आहे. ते म्हणाले की, “या संमेलनातील ‘माध्यमांची स्वायत्तता: नेमकी कुणाची?’ या टॉक शो मध्ये बोलण्यासाठी मला निमंत्रित केले आहे. या सन्मेलनाच्या उदघाटक नयनतारा सहगल होत्या. निमंत्रण पत्रिकेत त्यांचा ‘ज्येष्ठ भारतीय लेखिका’ असा उल्लेख आहे. त्यांचे निमंत्रण का रद्द करण्यात आले, हे आता स्पष्ट झाले आहे. ते निषेधार्ह आहे. नयनतारा सहगल यांचे संमेलनातील भाषण सोशल मिडियातून प्रकाशित झाले आहे. त्यात त्यांनी देशातील सरकार पुरस्कृत असहिष्णुता आणि सामाजिक समभावाला छेद देणाऱ्या व्यवहारावर नेमके बोट ठेवले आहे. ती आजची गरज आहे. नयनतारा सहगल यांच्या भाषणातील मुद्दे टॉक शो मधील माझ्याही बोलण्यातून अधिक कठोरपणे येतील. हे लक्षात घेऊन माझे निमंत्रण रद्द करावे. यास निमंत्रण वापसी समजावे”.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -