घरमहाराष्ट्रनिमंत्रण रद्द करणं ही आयोजकांची मोठी चूक - अरूणा ढेरे

निमंत्रण रद्द करणं ही आयोजकांची मोठी चूक – अरूणा ढेरे

Subscribe

नयनतारा सहगल निमंत्रण प्रकरणावरून ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी आयोजकांवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरून मोठा वाद सुरू आहे. नयनतारा सहगल यांना पाठवलेलं निमंत्रण पत्र रद्द करण्यात आल्यामुळे हा वाद सुरु झाला. या वादावर संमेलनाच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी आसूड ओढले आहेत. ‘नयनतारा सहगल यांना पाठवलेलं निमंत्रण रद्द करणं ही आयोजकांची गंभीर चूक आहे’, अशा शब्दांत अरुणा ढेरे यांनी आयोजकांना धारेवर धरलं. तसेच, ”कुणी झुंडशाही करत असेल तर आपण माघार घेणार का?’, असा सवाल देखील त्यांनी उपस्थितांना केला.

संमेलन सुरू होण्याआधीच वादात

९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला यवतमाळमध्ये शुक्रवारी संध्याकाळी सुरुवात झाली. संमेलन सुरू होण्याआधीपासूनच नयनतारा सहगल प्रकरणावरून वादात सापडलं होतं. त्या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यावर आपल्या भाषणामध्ये अरुणा ढेरेंनी आयोजकांचे चांगलेच कान टोचले आहेत.

- Advertisement -

वाचा हे कसं घडलं! – साहित्य संमेलनात दिसल्या नयनतारा

साहित्यप्रेमींच्या माना खाली गेल्या

‘कुणी झुंडशाही करत असेल, आपल्याला घाबरवत असेल तर त्याच्यासमोर नमतं घेणार आहोत का आपण? संमेलन साहित्य क्षेत्राबाहेरच्या व्यक्तींच्या हातात जात असल्याचा धोका आयोजकांना ओळखता आला नाही’, असं ढेरे यावेळी बोलताना म्हणाल्या. तसेच, ‘नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण रद्द केल्यामुळे फक्त संयोजन समिती आणि साहित्य संमेलनच नाही तर तमाम मराठी साहित्यप्रेमींच्या माना शरमेनं खाली गेल्या’, असं देखील अरुणा ढेरे यावेळी म्हणाल्या.

‘त्यांचा साहित्याशी सुतराम संबंध नाही’

दरम्यान, यावेळी बोलताना अरुणा ढेरे यांनी त्यांच्या भाषणात अप्रत्यक्षपणे मनसेकडून आक्षेप घेणाऱ्या यवतमाळच्या स्थानिक पदाधिकाऱ्याची देखील निर्भर्त्सना केली. ‘ज्यांचा साहित्याशी किंवा भाषेषी सुतराम संबंध नाही, अशांच्या लोकांच्या धमक्यांसमोर आयोजकांनी मान झुकवणे ही शोभणारी बाब नाही’, असं त्या म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – साहित्यिकांचा निमंत्रण वापसीचा सूर

आता भरपाई करण्याची वेळ

झाल्या प्रकाराबद्दल आता भरपाई करण्याची वेळ आली असल्याचं अरुणा ढेरेंनी संमेलनाध्यक्षपदाच्या भाषणादरम्यान सांगितलं. ‘साहित्याच्या शक्तीला न ओळखून आपण तिचा अपमान केला आहे. कुणीही यावं आणि संमेलन वेठीला धरावं असं आता आपण होऊ देता कामा नये. आतापर्यंत अनेक लाजिरवाण्या कारणांनी संमेलन वादात राहिलं आहे. अनेक साहित्यप्रेमी-साहित्यिकांनी संमेलनापासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला. पण आता साहित्यावरचं राजकारण आणि साहित्यजगातलं राजकारण या गोष्टी झुगारून देण्याची वेळ आली आहे. बदल एका रात्रीत होत नाहीत. पण ते दीर्घकाळात होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावे लागतील’, असं अरुणा ढेरे यावेळी म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -