खेड येथे विवाहित महिलेचा गळा आवळून खून

Khed, Pune
Married women murder in Khed
वाडा येथे सापडलेला मृतदेह

दिपावलीच्या सणानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना भिमाशंकर जवळील वाडा गावच्या हद्दीत वाडा ते गडदूबाई देवीकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला ३८ वर्षीय महिलेचा मृतदेह मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गायत्री धर्मेंद्र रावळ (वय ३८, रा. वाडा ता. खेड) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. दोरीने गळा आवळून महिलेचा निर्घुण खून करण्यात आला आहे. याप्रकरणी राजगुरूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपावलीच्या तोंडावर विवाहित महिलेची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळी साडेदहा वाजता गायत्री धर्मेंद्र रावळ यांचा वाडा गावच्या हद्दीतील आमड्याची आडव या गवताच्या मोकळ्या रानात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे आढळून आले. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थानी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा आणि पुरावे गोळा केले आहेत. याबाबत गायत्रीचा भाऊ शरद धोंडीभाऊ कडलक (रा. तिफणवाडी वाडा, ता. खेड) याने राजगुरूनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. खेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम पडवळ हे करीत आहेत.

मयत महिला पुर्वीची गुन्हेगार

मयत महिला गायत्री हीने साथीदारांसोबत मिळून चिमुकल्या मुलाची हत्या केली होती. त्यातून मयत महिलेला शिक्षाही भोगावी लागली होती. त्यामुळे या खुनामागे नेमके कोणते कारण असू शकते, याचा खुलासा पोलिसांच्या तपासानंतरच समजू शकेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here