घरमहाराष्ट्र‘माथेरानची राणी’ रूसली

‘माथेरानची राणी’ रूसली

Subscribe

पर्यटकांची झाली गैरसोय

पावसाची रिमझिम आणि धडाडून कोसळणार्‍या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी येथे आलेल्या दूरदूरच्या पर्यटकांची ‘माथेरानची राणी’ रूसल्याने भलतीच गैरसोय झाली. देश-विदेशतून येणार्‍या पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारी ‘माथेरानची राणी’ अर्थात मिनी ट्रेनची सेवा नेरळ-माथेरान दरम्यान पावसाळ्यात बंद असते. मात्र माथेरान-अमन लॉज दरम्यान पावसाळ्यातदेखील पर्यटकांच्या सेवेसाठी ट्रेनची शटलसेवा सुरू ठेवली जाते. गुरुवारी या शटल सेवेच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सकाळच्या पहिल्या फेरीपासून ती रद्द करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला.

मान्सून पर्यटन हंगामात माथेरान-अमन लॉज दरम्यान सुरू असलेली शटल सेवा येणार्‍या पर्यटकांसाठी पावसाळ्यातही महत्त्वाचा दुवा ठरत आहे. तसेच या सेवेमुळे रेल्वे प्रशासनालादेखील भरपूर प्रमाणात नफा मिळत असल्याने रेल्वे बोर्डाने मध्यंतरी या मार्गावर आठ नवीन इंजिनांचा ताफा देऊ केला आहे. परंतु एक वर्ष पूर्ण होत नाही तोच इंजिन रूळावरुन घसरणे, तसेच तांत्रिक बिघाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवास देण्यात फोल ठरत आहे. त्यामुळे निसर्ग सौदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडत आहे.

- Advertisement -

एनडीएम-४०५ या नवीन इंजिनातील एच्युवेटरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे सकाळी ८.१५ वाजल्यापासून (पहिली फेरी) दुपारपर्यंतच्या सर्वच फेर्‍या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मिनी ट्रेनला येथील स्थानकात दिवसभर थांबून रहावे लागले.
यावेळी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नेरळहून आलेल्या मटेरीयल ट्रेनचे एनडीएम ४०७ हे इंजिन जोडून २ वाजून ४० मिनिटांची माथेरान स्थानकातून अमन लॉज स्थानका दरम्यान पहिली शटल फेरी रवाना करण्यात आली. याचबरोबर एनडीएम ४०५ या इंजिनाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे, अशी माहिती येथील सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -