घरमहाराष्ट्रमावळ मतदारसंघात राजकीय धुळवड सुरू!

मावळ मतदारसंघात राजकीय धुळवड सुरू!

Subscribe

2014 च्या निवडणुकीनंतर मावळमध्ये वाढलेल्या तीन लाख नवीन मतदारांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे मावळच्या रणांगणात पार्थ शिवसेनेचे चक्रव्यूह भेदणार का, याची उत्सुकता मतमोजणीपर्यंत राहणार आहे.

कोकणातील महत्त्वाचा सण असलेला शिमगा झाला असून, धुलिवंदनाला रंगदेखील उधळून झाले आहेत. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मावळ मतदारसंघात आता राजकीय धुळवडीला प्रारंभ झाला आहे. लोकसभेला सर्वात चर्चेत मावळ लोकसभा मतदारसंघ राहणार असून, येथे शरद पवारांचे नातू आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांच्या उमेदवारीने रंग चढला आहे.

सलग दहा वर्षे सेनेच्या ताब्यात असलेला मावळ ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आतूर झाली असून, मतदारसंघाचा भाग असलेल्या उरण, पनवेल आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाची मदत महत्त्वाची ठरणार आहे. 2009 साली लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन मावळ मतदारसंघ अस्तित्वात आला. रायगडचे दोन भाग मावळ लोकसभा मतदारसंघामुळे झाले. शेकाप आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेले पनवेल, कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघ मावळला जोडले गेले. त्यामुळे मावळात 2009 ला राष्ट्रवादीने आझम पानसरेंना, तर शिवसेनेने गजानन बाबर यांना तिकीट दिले. उमेदवार नवखे असताना असतानादेखील रायगडमधील मतदारांनी भरभरून मतदान केले. बाबर यांनी राष्ट्रवादीच्या पानसरेंचा तब्बल 80,619 मतांनी पराभव करीत मावळात भगवा फडकवला. बाबर यांना 3 लाख 64 हजार 857, पानसरेंना 2 लाख 84 हजार 238 मतदारांनी कौल दिला होता. रात्रीच्या वेळी होणार्‍या गुप्त बैठकांनी आपला घात केला, असे वक्तव्य पानसरे यांनी पराभवानंतर करून खळबळ उडवून दिली.

- Advertisement -

2014 च्या निवडणुकीला मात्र चित्र पूर्णपणे बदलून गेले होते. मोदी लाट आणि खा. बाबर यांच्याऐवजी श्रीरंग बारणे यांना शिवसेनेने तिकीट दिले. त्यामुळे बाबर यानी शिवबंधन तोडले. त्यातच रायगडात राष्ट्रवादी आणि शेकापचे विळ्या भोपळ्याच नाते यामुळे शेतकरी कामगार पक्षाने लक्ष्मण जगतापरूपी आयात उमेदवार आणून रिंगणात उतरवला आणि बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादीला प्रतिष्ठा जपण्यासाठी राहुल नार्वेकर यांना उमेदवारी द्यावी लागली. जगताप यांची प्रचारात आघाडी यामुळे शेकाप बाजी मारणार असे वाटत असताना मोदी लाटेत मतदारांनी पुन्हा शिवसेनेवर विश्वास दाखवत बारणे यांना तब्बल 1लाख 57 हजार 319 एवढ्या प्रचंड मतांनी विजयी केले. बारणे यांना 5 लाख 12 हजार 226, तर शेकापच्या जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 व नार्वेकरांना अवघी 1 लाख 82,293 मतदारांनी मतदान केले. बारणे आणि नार्वेकर यांच्या मतांतील फरक 3 लाख 29 हजार 933 इतका प्रचंड होता. असे असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा मावळात उमेदवार दिला आहे.

पवार घराण्याचे वलय आणि शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील यांनी पार्थ पवार या राजकारणात बाळकडू अद्याप न प्यायलेल्या तरूणासाठी पवार यांच्याकडे शब्द टाकला आणि पार्थ पवारांना मावळच्या रणांगणात उतरवले आहे. मावळातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ कर्जत राष्ट्रवादीकडे असून, उरण शिवसेनेकडे, तर पनवेल भाजपकडे आहे. असे असताना देखील शेकापकडून पार्थसाठी करण्यात आलेला हट्टामागे दक्षिण रायगडच्या राजकारणाशी संबध जोडला जात आहे. रायगडमधून तटकरे पुन्हा शिवसेनेच्या अनंत गीते यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत ते शेकापच्या मदतीवर! गेल्यावेळी मोदी लाटेत देखील 2400 मतांनी तटकरेंचा निसटता पराभव झाला होता. त्यावेळी जयंत पाटील आणि तटकरे यांचे सबंध पराकोटीचे ताणले होते. परंतु आता शेकापची साथ राष्ट्रवादीला मिळाली आहे. सुनील तटकरे यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेत पाठवायचे त्यासाठी पार्थला मावळच्या कुरूक्षेत्रात उतरविण्यात आल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत. अजित पवार यांनी देखील कर्जतच्या सभेत दिवसा एक आणि रात्री दुसरा असा प्रचार होण्याची भीती बोलून दाखविली आहे. कोकणात शिमग्याला सोंग काढण्याची प्रथा असून रात्र थोडी आणि सोंग फार या म्हणीचा मावळात राहणार्‍या अजित पवारांनी धसका घेतला असून रात्रीची सोंग काय बदल घडवतील, याची भीती राष्ट्रवादीला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -