घरमहाराष्ट्रनाशिकसह मुंबईचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर

नाशिकसह मुंबईचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर

Subscribe

नाशिकसोबतच मुंबई महानगर पालिकेचं महापौरपद देखील खुल्या प्रवर्गामध्ये वर्ग करण्यात आलं आहे. मुंबईत याचा फारसा परिणाम जाणवणार नसला, तरी नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आरक्षणामुळे संधी न मिळू शकलेल्या नगरसेवकांना आता महापौर म्हणून नशीब आजमावण्याची संधी मिळाली आहे. मंत्रालयात बुधवारी अर्थात १३ नोव्हेंबर रोजी निघालेल्या आरक्षण सोडतीत महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे आता महापौरपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. एकीकडे सत्ता मिळवण्यासाठी विरोधीपक्ष मोर्चेबांधणी करतांना दिसेल तर दुसरीकडे महापौरपदाची उमेदवारी मिळावी म्हणून प्रमुख पक्षाचे इच्छुक फिल्डिंग लावताना दिसतील. नाशिकसोबतच मुंबईचं महापौरपद देखील पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलं आहे. विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे देखील खुल्या प्रवर्गातूनच निवडून आले आहेत. आता पुन्हा महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर, शुभदा गुडेकर, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, यशवंत जाधव यांची नावं आता मुंबईच्या महापौरपदासाठी चर्चेत आली आहेत.

नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग येणार

दरम्यान, नाशिकच्या विद्यमान महापौर रंजना भानसी या अनुसूचित जमाती संवर्गातून महापौर झाल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीमुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. त्यांची मुदत येत्या १५ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यानंतर होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी स्पर्धेत उद्धव निमसे, प्रथमेश गीते, संभाजी मोरुस्कर, दिनकर आव्हाड, शिवाजी गांगुर्डे, दिनकर पाटील, शिवसेनेचे अजय बोरस्ते, विलास शिंदे आदींची नावे चर्चेत आहेत. विद्यमान महापौरपद राखीव गटातलं असताना आता ते खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आल्यामुळे नाशिकच्या स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अशा आहेत महापौरपदासाठीच्या सोडती…

• मुंबई – खुला प्रवर्ग
• पुणे – खुला प्रवर्ग
• नागपूर – खुला प्रवर्ग
• ठाणे – खुला प्रवर्ग
• नाशिक – खुला प्रवर्ग
• नवी मुंबई – खुला प्रवर्ग महिला
• पिंपरी चिंचवड – खुला प्रवर्ग महिला
• औरंगाबाद – खुला प्रवर्ग महिला
• कल्याण डोंबिवली – खुला प्रवर्ग
• वसई विरार – अनुसूचित जमाती
• मिरा भाईंदर – अनुसुचित जाती
• चंद्रपूर – खुला प्रवर्ग महिला
• अमरावती – बीसीसी
• पनवेल – खुला प्रवर्ग महिला
• नांदेड – बीसीसी महिला
• अकोला – खुला प्रवर्ग महिला
• भिवंडी – खुला प्रवर्ग महिला
• उल्हासनगर – खुला प्रवर्ग
• अहमदनगर – अनुसूचित जाती (महिला)
• परभणी – अनुसूचित जाती (महिला)
• लातूर – बीसीसी सर्वसाधारण
• सांगली – खुला प्रवर्ग
• सोलापूर – बीसीसी महिला
• कोल्हापूर – बीसीसी महिला
• धुळे – बीसीसी सर्वसाधारण
• मालेगाव – बीसीसी महिला
• जळगाव – खुला प्रवर्ग महिला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -