वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांचे उन्हाळी २०२० परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले.

Mumbai

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जुलैनंतर घेण्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांचे उन्हाळी २०२० परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार एमबीबीएसच्या परीक्षा १६ ते २२ जुलै, डेंटलच्या १६ ते २३, बीएएमएसच्या १६ ते २७ आणि बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ ते २५ जुलैदरम्यान होणार आहेत.

देशात पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व कॉलेजांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचीही मागणी केली असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी उन्हाळी २०२० परीक्षा १५ जुलैपासून घेण्याची तयारी दर्शवल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षेची तयारी सुरु करत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार एमबीबीएसची परीक्षा १६ ते २२ जुलै, डेंटलच्या १६ ते २३, बीएएमएसच्या १६ ते २७, बीयूएमएस १६ ते २५ आणि बीएचएमएस अभ्यासक्रमाची परीक्षा १६ ते २५ जुलैदरम्यान होणार आहे. त्याचप्रमाणे बेसिक बीएससी नर्सिंगची परीक्षा १६ ते १८, पी.बी. बीएससी नर्सिंगची परीक्षा १६ ते २० जुलैला होणार आहेत. त्याचप्रमाणे बॅचलर फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रकही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर शंका निरसनासाठी हेल्पलाईन नंबर 

परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना इमेल, मेसेज आणि व्हाट्सअपच्या माध्यामातून कळवण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर माध्यमातून येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी शाखानिहाय हेल्पलाईन क्रमांक विद्यापीठाने संकेतस्थळावर दिले आहेत. तसेच पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी [email protected], पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी [email protected] या मेल आयडीवर विद्यार्थ्यांना मेल करता येणार आहे.

घराजवळील परीक्षा केंद्रावर देता येणार परीक्षा 

उन्हाळी २०२० लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या कॉलेजमध्ये घेण्यात येणार आहेत. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक गावातील, नजीकच्या पसंतीच्या परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परंतु त्यासाठी महाविद्यालयानी विद्यार्थ्यांकडून पालकांचे निवासी शहर असल्याचे प्रमाणपत्र व स्वाक्षांकित अर्ज घेऊन ते १२ जूनपर्यंत विद्यापीठाच्या संबंधित विद्याशाखेच्या इमेलवर पाठवायची आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी केंद्र न मिळाल्यास स्वतःच्याच कॉलेजात परीक्षा केंद्र असणार आहे.