घरमहाराष्ट्र'खेड तालुक्यात आमदार-खासदारांच्या भावांचा हस्तक्षेप वाढला'

‘खेड तालुक्यात आमदार-खासदारांच्या भावांचा हस्तक्षेप वाढला’

Subscribe

सार्वजनिक क्षेत्रात समाजाभिमुख काहीही योगदान नसताना गेल्या पंधरा वर्षात खेड तालुक्यात आमदार आणि खासदार यांच्या भावांचा मोठा हस्तक्षेप वाढला आहे, असे वक्तव्य खेड पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसभापती अमोल पवार यांनी केले आहे.

सार्वजनिक क्षेत्रात समाजाभिमुख काहीही योगदान नसताना गेल्या पंधरा वर्षात खेड तालुक्यात आमदार आणि खासदार यांच्या भावांचा मोठा हस्तक्षेप वाढला आहे. यांना भाऊ तरी नक्की किती आहेत? हे आम्हां जनतेला अजून समजलेच नाही, असे स्फोटक वक्तव्य खेड पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसभापती अमोल पवार यांनी कोहिंडे बु. (ता. खेड) येथे करून खेड तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.

इच्छा नसताना पदाचा राजीनामा

पवार हे खेड पंचायत समितीत काँग्रेस पक्षाचे एकमेव पंचायत समिती सदस्य आहे. शिवसेनेने गेल्या दीड वर्षापूर्वी पवार यांना बरोबर घेत त्यांना उपसभापतीपद बहाल करून पंचायत समितीवर भगव्याची सत्ता आणली होती. कालावधी पूर्ण झाल्यानंतर इच्छा नसतानाही पवार यांना उपसभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे नाराज झालेल्या पवार यांनी पद सोडल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच शिवसेनेपासून ‘यु टर्न’ घेत आमदार सुरेश गोरे तसेच खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे नाव न घेता त्यांना लक्ष केले. आमदार आणि खासदार यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या भावांचा सार्वजनिक कार्यक्रमांममध्ये होत असलेला वावर यावर भाष्य केल्याने तालुक्याच्या राजकारणात नवीन मुद्दा पुढे आला आहे. यातून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान उपस्थित होणाऱ्या राजकीय मुद्यांची झलक दिसून आली आहे.

- Advertisement -

विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम

विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच कोहिंडे येथे झाला. यावेळी पवार यांनी हे विधान केले. यावेळी भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप मेदगे, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे

पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर दिवंगत माजी आमदार नारायणराव पवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा दाखला देताना ते पुढे म्हणाले, ‘ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अपमान करून त्यांच्या नंतर आम्ही भाषणे करू, असा हट्ट हे भाऊ धरून ते चुकीच्या प्रथा पाडत आहेत. अनेक वर्ष समाजासाठी योगदान दिलेल्या व निष्ठावान पदाधिकाऱ्यांचा अपमान हे भाऊ करत असून ही गोष्ट चांगली नाही. स्वर्गीय नारायणराव पवार यांनी वीस वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले नाही, परंतु त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याने कधीही कुठल्याही कामात हस्तक्षेप केला नाही, की सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याऐवजी हजेरी लावून त्यांच्या कामात लुडबुड केली नाही. त्यामुळे अनेक नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली. सध्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे.’

- Advertisement -

आक्रमक राजकीय भाषण

यावेळी पवार यांच्यासह बुट्टे पाटील, मेदगे यांनी देखील आक्रमक राजकीय भाषण केले. दुसऱ्या फळीतील या नेत्यांनी आपल्या भाषणात आक्रमक रूप घेतल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण निर्मिती होत असल्याचे दिसते आहे. आपापल्या भागात राजकीय ताकद असलेले हे दुसऱ्या फळीतील राजकीय पुढारीच निवडणुकीचा निकाल बदलण्यास कारणीभूत ठरत असतात. या सर्वांनीच मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी एक वर्ष अगोदर एकत्र येऊन माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या विरुद्ध रान उठवले होते. आपआपल्या भागात ताकद असणारे हे विविध पक्षातील पुढारी लोकसभेला आणि विधानसभेला नक्की कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार यावर खेड तालुक्यातील राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -