Friday, August 7, 2020
Mumbai
27.8 C
घर ताज्या घडामोडी पुलवामा हल्ल्याबाबत जुन्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा युटर्न; झेंड्याबाबतही दिले स्पष्टीकरण

पुलवामा हल्ल्याबाबत जुन्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा युटर्न; झेंड्याबाबतही दिले स्पष्टीकरण

Aurangabad
raj thackeray on pulwama
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यावरुन आपली भूमिका बदलली

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पुर्ण होत आहे. देशभरातून हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पुलवामा हल्ल्यावर मागच्या वर्षी संशय व्यक्त करणाऱ्या राज ठाकरेंनी वर्षभरात पुलवामा बद्दलच्या भूमिकेवरुन युटर्न घेतला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी पुलवामा हल्ला घडला की घडविण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आज हल्ल्याच्या वर्षपुर्तीनंतर राज ठाकरेंना औरंगाबाद येथे काही पत्रकारांनी या विषयी छेडले असता त्यांनी आपल्या जुन्या भूमिकेपासून फारकत घेतली.

काय म्हणाले राज ठाकरे?

एक वर्षापुर्वी पुलवामा हल्ल्यावर तुम्ही संशय व्यक्त करत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. आज तुमची काय भूमिका आहे? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, “मी त्यावेळी जी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती, त्यावर बोललो होतो. पुलवामाचा हल्ला घडवून आणला असे त्यावेळी बोलले जात होते, त्याबाबतच मी काही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आता एक वर्षानंतर जे शहीद झाले आहेत, त्यांना आपण श्रद्धांजली व्यक्त करु शकतो. जे घडायचे होते, ते आता घडून गेले आहे.”

 

राजमुद्रेचा झेंडा का स्वीकारला?

मनसेने तिरंगी झेंडा बदलून भगव्या रंगाचा झेंडा स्वीकारला आहे. या झेंडयावरील जुने इंजिन चिन्ह जाऊन आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा दाखवण्यात आली आहे. ही राजमुद्रा का वापरली असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, म्हणून आम्ही ही राजमुद्रा झेंड्यावर घेतली आहे. मात्र निवडणुकीच्या काळात आमच्या झेंड्यावर राजमुद्रा दिसणार नाही. तिथे फक्त मनसेचे इंजिनच दिसेल, अशी स्पष्टोक्ती राज ठाकरे यांनी दिली. तसेच आता बदलेला झेंडा बदलण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वीच घेतला होता. तसे पत्र देखील निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी हा दुसरा झेंडा अधिकृतपणे स्वीकारण्याचा निर्णय घेतला.