शेतकऱ्यांचे अश्रू ऑनलाईन पुसणार का? अन्यथा ‘ठाकरे’ नावावरचा विश्वास उडेल

CM Uddhav Thackeray On farmers help
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवला आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे हाताला आलेले पिकं वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध झालेत. या कठिण काळात आता सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची मागणी सर्वस्तरातून होत असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक आवाहान केले आहे. “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल Online बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या, अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल”, अशी साद बाळा नांदगावकर यांनी घातली आहे.

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यात ४ जणांचा तर सोलापुरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जिल्ह्यातील नागरी भागात पूर आल्यामुळे घरांमध्ये, शेतांमध्ये पाणी साचले आहे. याच विषयावर नांदगावकर यांनी जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला त्यांनी मुख्यमंत्र्यांना मदतीचे आवाहन केले असून घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

नांदगावकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा. आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन बघता येणार नाहीत. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या, अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन घोषित झाल्यापासून घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका सातत्याने होत आहे. विरोधकांनी हा मुद्दा अनेकदा बोलून दाखविला. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर दिलेले आहे. तर शरद पवार यांनी देखील या मुद्द्यावरुन ठाकरेंची पाठराखण केली होती. त्यामुळेच आता अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाहेर पडावे, अशी सूचना मनसेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून राज्यातील अतिवृष्टी परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केले आहे.