भारत देश ‘ICU’मध्ये; राज ठाकरेंची व्यंगात्मक टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धनोत्रयदशीच्या निमित्ताने एक व्यंगचित्र साकारत, पुन्हा एकदा भाजपवर टीका केला आहे.

Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच आपल्या व्यंगचित्रातून भाजप किंवा अन्य विरोधी पक्षांवर टीका करत असतात. आज धनोत्रयदशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी एक नवं व्यंगचित्र साकारत भाजप सरकारवर बोचरी टीका केली आहे. सद्य परिस्थितीवर भाष्य करणारं हे व्यंगचित्र त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलं असून, सध्या ते सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मनसे समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्यगंचित्राला पसंती देत आहेत. अनेक लोकांनी तर या व्यंगचित्राचं समर्थन करत फेसबुकच्या माध्यमातून भाजप सरकारवर आणि भाजपच्या नेत्यांवर टीकादेखील केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या समर्थकांनी या व्यंगचित्रावरुन राज ठाकरेंनाच धारेवर धरलं आहे. दरम्यान, ६ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत राज ठाकरे व्यंगचित्रांची मालिका चालवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता राज यांचे पुढील व्यंगचित्र कोणते असणार आणि त्यातून ते कोणावर निशाणा साधणं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

व्यंगचित्रात नेमकं काय? 

आजचा धनोत्रयदशीचा दिवस अनेकजण वैद्यकीय शास्त्राचा देव ‘धन्वंतरी’ यांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा करतात. आजचा दिवस महत्वाचा असल्याचं सांगत राज यांनी त्यांच्या व्यंगचित्रात धन्वंतरी साकारले आहेत. तर दुसरीकडे त्यांनी भारत देश आयसीयूमध्ये दाखल असल्याचं दाखवलं आहे. देशाच्या काळजीत आयसीयूबाहेर काळजीत उभे असलेले धन्वंतरी यामध्ये सांगत आहेत की, ‘काळजी करण्याचं कारण नाही. परंतु गेल्या चार-साडेचार वर्षात त्याच्यावर (देशावर) खूप अत्याचार झालेत. लोकसभा निवडणुकीनंतर ते शुद्धीवर येतील’. अशा बोचऱ्या शब्दांमध्ये राज यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.

यापूर्वीही राज ठाकरेंनी वेळोवेळी अनेक मुद्द्यांवरुन भाजपवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्यावर झालेला वारेमाप खर्च, देशातील वाढता भ्रष्टाचार, वाढत चाललेली महागाई अशा अनेक मुद्द्यांवरुन राज यांनी भाजप सरकारचा आणि पंतप्रधान मोदींचा चांगलाच समाचार घेतला आहे. राज ठाकरेंच्या आतापर्यंतच्या अशाच काही व्यंगचित्रांवर एक नजर…

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here