अनेक लोक आपल्या भूमिका सोडून सत्तेत आले

Mumbai
raj thackeray mns chief
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शिवसेनेला टोला

औरंगाबादचे संभाजीनगर झाले तर हरकत काय? चांगल्या गोष्टींसाठी बदल आवश्यक असतात. अनेक लोकांनी अनेक गोष्टींमध्ये बदल केले. अनेक लोक आपल्या भूमिका सोडून सत्तेत आले, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेनेला लगावला. राज ठाकरे सध्या औरंगाबाद दौर्‍यावर आहेत. या दौर्‍याचा आज त्यांचा दुसरा दिवस आहे.

त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला. मी कुठलीही भूमिका बदलली नाही. पाकिस्तानी कलावंतांना हाकलून देण्याचे काम आम्ही केले. जे स्वत:ला हिंदू म्हणून घेतात त्यांनी हाकलले का? रझा अकादमीविरोधात मोर्चा कोणी काढला? झेंडा बदलला म्हणून भूमिका बदलली असं होत नाही. ज्या प्रकारची कृती आवश्यक आहे ती कृती फक्त माझ्याच पक्षाकडून झाली. तेव्हा बाकीचे पक्ष कुठे गेले होते?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा हा मी पाच ते सहा वर्षांपूर्वीच आणला आहे. तो झेंडा अधिकृतपणे जाहीर करण्याबाबत गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू होती.

या झेंड्याचे अनावरण करण्यासाठी अधिवेशन ठरवले. निवडणूक आयोगाला या झेंड्याबाबत तीन ते चार वर्षांपूर्वी माहिती दिली होती. याशिवाय झेंड्याबाबत दोन महिन्यांपूर्वीच अधिकृत पत्र आम्ही निवडणूक आयोगाला दिले. पक्षाची भूमिका गेल्या 14 ते 15 वर्षांपासून मांडतच आलो. दुसरे जी भूमिका मांडत नव्हते ती भूमिका स्पष्टपणे मांडली, असे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत.

मात्र, त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले असतात. ईव्हीएमकडून नोटीस बजावण्यात आली. त्यावेळी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटलो होतो. मात्र, आपल्याकडे भेटीचे रूपांतर लगेच मैत्रीत होते आणि लगेच चर्चा सुरू होते. असं नसतं, संबंध हे प्रत्येकाचे असतात. आताचं तुम्ही महाराष्ट्रातलं सरकार पाहिलंत तर मला असं वाटतं की त्यांची वेगळीच मैत्री झाली आहे, असा चिमटा राज ठाकरे यांनी काढला. हिंदुत्व म्हणजे विकासाकडे लक्ष नाही, असे नसते. एखादे शहर बदलणे हा फक्त राजकीय अजेंडा नाही तर ते माझे फॅशनसुद्धा आहे. जगभरातील शहर मी फिरलो तर आपल्या महाराष्ट्रातही अशी शहरे असावी असे मला वाटते. नाशिकमध्ये काय केले ते बघा, असे राज ठाकरे म्हणाले.

दौरा अर्धवट सोडणार
मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांचा मराठवाडा दौरा अर्धवट सोडणार आहेत. राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा तीन दिवसांचा होता. मात्र, ते शनिवारी सकाळीच मुंबईत परतणार आहेत. राज यांचे शनिवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र, यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हिंदूजननायक उपाधीलाही नकार
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौर्‍याच्या निमित्ताने संपूर्ण शहरात त्यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावर राज यांच्या नावासमोर हिंदूजननायक असा उल्लेख होता. या उपाधीबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरे काहीसे संतापलेले दिसले. मी तसे काही मानत नाही. याआधी माझ्या नावापुढे हिंदूहृदयसम्राटअशी उपाधी लावण्यात आली होती. त्यावेळीही मी असे काही करू नये अशी ताकीद दिली होती, याची आठवण राज यांनी करून दिली. माझ्या परवाच्या मोर्चावेळी एका चॅनलनेच हिंदूजननायक लिहिले होते . त्यांना विचारून बघा, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here