‘जेव्हा अभिमन्यू एकटा लढत होता तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता कर्ण?’, मनसेचा शिवसेनेला सवाल

mns sandeep deshpande reaction on sanjay raut appeal to rai thackeray
'जेव्हा अभिमन्यू एकटा लढत होता तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता कर्ण?', मनसेचा शिवसेनेला सवाल

ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहेत. मुंबईतून याचं ब्रँडना नष्ट करायचं आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळावायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हे सुद्धा ठाकरे ब्रँडचे घटक आहेत. या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. जरी शिवसेनेशी त्यांचे मतभेद असेल तरी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा, असं सामनाच्या रोखठोकच्या सदरात म्हणतं संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाभारतातील एक प्रसंग सांगून शिवसेनेला सवाल केला आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील असं एका मराठी वृत्तवाहिनी बोलत संदीप देशपांडे यांनी भूतकाळातील काही गोष्टींची आठवण करून देत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ‘जेव्हा २०१८ सालापासून महाराष्ट्रासाठी आणि मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि राज ठाकरेंनी आंदोलन उभा केली. त्यावेळेला शिवसेनेचे खासदार दिल्लीमध्ये मूग गिळून गप्प होते. ज्यावेळी पाकिस्तानी कलाकरांना या महाराष्ट्राच्या भूमीच्या बाहेर हकलवून द्यावं अशी जेव्हा आम्ही भूमिका घेतली. त्यावेळेला देखील शिवसेनेचे नेते गप्प होते.’

‘२०१४ आणि २०१७ सालच्या निवडणूकीत जेव्हा राज साहेबांनी साद घातली. त्यावेळेला शिवसेनेच्या नेत्यांनी आमच्यासोबत दगा फटका केला. रात्रोरात्र आमचे नगरसेवक पळवून नेले. त्यामुळे जो प्रश्न कृष्णाने कर्णाला केला. जेव्हा त्याचं चाक रुतलं होतं. तोच प्रश्न आज मला विचारावासा वाटतो. जेव्हा अभिमन्यू एकटा लढत होता त्यावेळेस तुझा धर्म कुठे गेला होता कर्ण?’, असा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सवाल केला आहे.


हेही वाचा – ‘सामना’मधून संजय राऊत यांची राज ठाकरेंना साद