घरदेश-विदेशमोदी सरकार पुरवणार स्वस्त दरात अन्‍नधान्य

मोदी सरकार पुरवणार स्वस्त दरात अन्‍नधान्य

Subscribe

सर्वसामान्यांना दिलासा!

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अन्नधान्य कसे मिळणार या विवंचनेत देशातील सर्वसामान्य जनता होती. मात्र देशातील जनतेला मोदी सरकारने दिलासा दिला आहे. सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता सरकार सर्वसामान्यांना स्वस्तात अन्नधान्य पुरवणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून त्याची माहिती केंद्रीय प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

देशातल्या ८० कोटी जनतेला स्वस्त दराने अन्नधान्य पुरवले जाणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. एका व्यक्तीमागे ७ किलो रेशन देण्यात येईल. गहू प्रतिकिलो २ रुपये दराने, तर तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये दराने दिला जाणार आहे. पुढील ३ महिने या दराने अन्न पुरवठा केला जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि गरज नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. डॉक्टर, पत्रकार यांंचे सध्याच्या परिस्थितीत सुरू असलेले काम ही जनसेवा आहे.

- Advertisement -

त्यामुळे त्यांना त्रास होईल, असे वर्तन कोणीही करू नये, असेदेखील जावडेकर पुढे म्हणाले. नागरिकांना सरकारकडून स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जाईल. पुढील तीन महिन्यांचे अन्नधान्य आधीच दिले जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे काम अखंडपणे सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २१ दिवस घरात राहणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांनी एकमेकांपासून पाच फुटांचं अंतर ठेवून कोरोनाचा संसर्ग टाळावा, असेदेखील ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री देशवासीयांशी संवाद साधला. देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन होत असल्याची घोषणा त्यांनी केली. काल रात्री १२ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. या प्रकरणी गृह मंत्रालयानं काही मार्गदर्शक सूचना घालून दिल्या आहेत. त्यातल्या नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -