मोदी माझ्यासाठी नरेंद्रभाई

 ठाकरेंकडून मोदींच्या कौतुकाची सुरुवात

Mumbai
Uddhav Thackeray,Devendra Fadnavis

नरेंद्र मोदी हे देशासाठी पंतप्रधान असतील, मात्र माझ्यासाठी ते नरेंद्रभाई आहेत. तुमच्या भावासारखी असणारी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असणे ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. शुक्रवारी अमरावती येथील युतीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुक्तकंठाने नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. आता अनेकजण भाजप आणि नरेंद्र मोदींविषयी माझे इतके मनपरिवर्तन कसे झाले, असा प्रश्न उपस्थित करतील. मात्र, यापूर्वी आम्ही केलेला विरोध हा व्यक्तीगत कारणास्तव नसून जनतेच्या कामांसाठी होता. उध्दव ठाकरे यांच्या या परिवर्तनावर सभेतल्या उपस्थितांमध्ये एकच चर्चा होती.

युती करतानाच या मुद्यांवर सहमती झाली आणि भाजपने ते मार्गीही लावले याचा आम्हाला आनंद आहे, असे उद्धव यांनी सांगितले. शिवसेना-भाजप हे पक्ष देशातील सामान्य माणसाची शेवटची आशा आहेत. आता देशात अंधार पसरला तर देशाला तारणारा दुसरा कोणताही पक्ष नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष जरुर झाला. पण अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे या आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या संघर्षापेक्षा तो निश्चितच मोठा नाही,असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

फेविकॉल का मजबूत जोड- फडणवीस

या सभेत म्हणजे ‘ही युती फेविकॉल का मजबूत जोड, ती तुटणार नाही’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. युतीच्या प्रचाराला अमरावतीतून सुरूवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी युतीचे गुणगान गायले. लोकसभा निवडणुकीचा हा पहिलाच मेळावा आहे. ही युती केवळ दोन संघटनांची युती नाही. ही विचारांची युती आहे. आम्हाला हिंदुत्ववादी संघटना असल्याचा अभिमान आहे, ज्याला हिंदुत्वाबद्दल प्रेम आहे त्या सर्वांचे स्वागत आहे. युतीमुळे विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काहींनी घाबरून आधीच माघार घेतल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी पवारांचे नाव न घेता लगावला आहे. काही कॅप्टन्सनी आपण लढणार असल्याचे जाहीर केले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला. पण त्यानंतर आपण लढणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले असेही ते म्हणाले. भाजप आणि शिवसेना युती ही निवडणुकीपुरती नाही तर ही अभेद्य युती आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपले सरकार येण्याच्या आधी इथे गरिबी हटली नव्हती. पण इथल्या गरीबांची बँकेत खाती तयार झाली. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गरीबांना घर मिळाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

किमान शरद पवारांना तरी भाजपमध्ये घेऊ नका

इतर पक्षांतील नेते ज्याप्रकारे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत ते पाहता निवडणुकीपर्यंत समोर लढायला कोणी शिल्लक राहील किंवा नाही, अशी शंका वाटते. सध्या कोणावरही टीका करायची म्हटली की तो उद्या शिवसेना किंवा भाजपमध्ये येईल, अशी भीती वाटते. त्यामुळे आता भाजपने किमान शरद पवार यांना तरी पक्षात घेऊ नये, अशी मिश्किल टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य केले. हल्ली वडील एका पक्षात असतात, मुलगा दुसर्‍या पक्षात असतो. शिवसेना-भाजप निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, अडचण इतकीच आहे की टीका नेमकी कोणावर करावी? आज ज्यांच्यावर टीका करावी ते उद्या शिवसेना किंवा भाजपमध्ये येतात. अशाने उद्या सगळेच शिवसेना किंवा भाजपमध्ये आले तर समोर कोण शिल्लक राहणार? समोर लढायला कोणीच नसेल तर निवडणुकीत गंमत उरणार नाही, असे उद्धव यांनी म्हटले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here