Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर ट्रेंडिंग मुंबईत संध्याकाळीही पावसाचा जोर वाढणार

मुंबईत संध्याकाळीही पावसाचा जोर वाढणार

Mumbai
heavy rain in mumbai

मुंबईत सकाळपासून पावसाच्या जोरदार कमबॅकमुळे अवघ्या तीन तासांच्या कालावधीतच १५७ मिमी इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अति मुसळधार पावसाची अशी ही नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात अशा दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच पावसाचा मोठा जोर पहायला मिळाले आहे. मुंबईत आज अति मुसळधार पाऊस पडेल असा ऑरेंज अॅलर्ट हवामान विभागाकडून गुरूवारीच जारी करण्यात आला होता.

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीसाठी २४ ते ४८ तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज सकाळी ८.३० ते ११.३० या कालावधीत पावसाने जोरदार बॅटिंग केल्याचे चित्र मुंबई शहर तसेच उपनगरातील भागात पहायला मिळाले. अवघ्या काहीच तासांच्या पावसाने मुंबईत सायन, हिंदमाता यासारखे सखल भाग जलमय झाले होते. परिणाम मुंबई वाहतूक पोलिसांना याठिकाणची रस्ते वाहतूक वळवावी लागली होती. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागले. सायनच्या गांधी मार्केट परिसरात पाणी साचल्याने सायन सर्कलपासून ही वाहतूक आतल्या रस्त्याने वळवण्यात आली होती. तसेच हिंदमाता परिसरातील पाणी वाढल्यानेही याठिकाणही रस्ते वाहतूक वळवण्यात आली होती.

पश्चिम किनारपट्टीच्या भागात ढग असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे येणाऱ्या ४८ तासांमध्ये मुंबईसाठी आणि पश्चिम किनारपट्टीसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुपारच्या वेळात पावसाचे थोडाचा वेग कमी केला असला तरीही सायंकाळी मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी मुंबईसह पश्चिम किनारपट्टीत पाऊस पुन्हा जोर धरेल असा इशारा दिला आहे.

तीन तासात इथे झालाय पाऊस

सर्वाधिक पावसाची नोंद ही कफ परेड भागात झाली आहे. दक्षिण मुंबईतच १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात ९७ मिमी पावसाची नोंद झाली. वरळीत ८५ मिमी, मलबार हिलमध्ये ८१ मिमी, हाजी अलीत ७६ मिमी, माटुंग्यात ६५ मिमी, शिवडी आणि परळमध्ये ६४ मिमी, धारावीत ६२ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई उपनगरात सांताक्रुझ येथे ६१ मिमी पावसाची नोंद झाली. अंधेरीत सर्वाधिक पावसाची नोंद म्हणजे ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ सायन ५५ मिमी, वांद्रे ५१ मिमी, वर्सोवा ४२ मिमी, विलेपार्ले ४० मिमी, चेंबूर २९ मिमी, भांडूप २५ मिमी, कुर्ला २३ मिमी, घाटकोपर २० मिमी आणि मुलुंड १७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

असा मोजतात पाऊस

प्रादेशिक हवामान विभागाकडून पावसाच्या नोंदीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये ताशी २० ते ३० मिमी पावसाची नोंद मुसळधार म्हणून होते. तर ताशी ३० ते ५० मिमी पावसाची नोंद अति मुसळधार म्हणून होते. तसेच ताशी ५० ते १०० मिमी पावसाची नोंद ही अतिवृष्टी म्हणून होते. तर प्रत्येक तासाला १०० मिमी पाऊस पडला तर त्याची नोंद ही ढगफुटी म्हणून होते.