घरमहाराष्ट्र५०० पेक्षा जास्त सेवानिवृत्त एसटी कर्मचारी हक्काच्या पैशांपासून वंचित

५०० पेक्षा जास्त सेवानिवृत्त एसटी कर्मचारी हक्काच्या पैशांपासून वंचित

Subscribe

लेखा अधिकारी भ्रष्टाचाराला वाव देतात काय?

एसटी महामंडळातून सेवानिवृत्त, मृत्यू, बडतर्फ, राजीनामा, स्वेच्छानिवृत्ती इत्यादी कारणांमुळे सेवामुक्त झालेल्या ५०० पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना अद्यापही भविष्य निर्वाह निधी आणि उपदान मिळालेले नाही. कारण एसटीच्या विभागीय लेखा अधिकार्‍यांनी लेखा विभागाला यासंबंधीची माहिती देण्यास उशीर लावल्याने महामंडळाच्या मुख्यालयात सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या हक्कांच्या पैशासाठी चकरा मारताना दिसून येत आहेत. त्यामुळे एसटीच्या निवृत्त कर्मचार्‍यांनी एसटी महामंडळाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

शासन नियमानुसार राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेला कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्त, मृत्यू, बडतर्फ, राजीनामा, स्वेच्छानिवृत्ती इत्यादी कारणांमुळे सेवा मुक्त होतो त्यादिवशी त्याला उपदानाची अंतिम देयके द्यावी लागतात. याकरिता विभागीय लेखा अधिकारी यांची संपूर्ण माहिती कर्मचार्‍यांच्या निवृत्ती महिन्यात राज्य परिवहन महामंडळाच्या लेखा शाखेला देणे अनिवार्य असते. त्यानंतर निवृत्तीच्या दिवशी उपदान आणि भविष्य निर्वाह निधी कर्मचार्‍यांच्या खात्यांवर वर्ग केली जाते. पंरतु, एसटी महामंडळाच्या विभागीय लेखा अधिकारी वर्गाकडूनही सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची माहिती देण्यास फार उशीर करत असल्यामुळे त्यांना वेळेवर रक्कम मिळत नाही. त्यामुळे एसटीच्या मुख्यालयात सेवा निवृत्त कर्मचार्‍यांना चकरा माराव्या लागतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले पाच महिने राज्यभरातील एसटी ठप्प होती. त्यामुळे या निवृत्त कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधी आणि उपदान देण्यास उशीर होत आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात येत आहे. मात्र, कोरोनापूर्वीच्या निवृत्त कर्मचार्‍यांनासुद्धा आतापर्यंत भविष्य निर्वाह निधी आणि उपदान मिळालेले नाही. निवृत्ती वेतनासाठी एसटी कर्मचार्‍यांना अशा पद्धतीच्या फेर्‍या मारायला लावणे ही बाब गंभीर आहे. कारण आयुष्यभर कमी पगारात सेवा देणारा एसटीचा कर्मचारी नेहमीच एसटीच्या सुख-दुःखात सोबत असतो. मात्र, निवृत्तीसाठी अशा प्रकारची वागणूक देणे बरोबर नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या विभागीय लेखा अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी निवृत्त कर्मचार्‍यांनी केली आहे.

- Advertisement -

भ्रष्टाचाराला वाव

एसटी महामंडळाच्या विभागीय लेखा अधिकारी आपले कर्तव्य चोख बजावत नसल्यामुळे आज ५०० पेक्षा जास्त सेवा निवृत्त कर्मचार्‍यांना त्यांच्या हक्काची जमापुंजी मिळाली नाही. त्यामुळे अनेकांना एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आणि विभागीय लेखा अधिकार्‍यांकडे खेटा घालाव्या लागत आहेत. ही वेळ विभागीय लेखा अधिकारी जाणूनबुजून आणत असल्याचा आरोप निवृत्त कर्मचार्‍यांनी केला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळेल अशी भावना निवृत्त कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे. तसेच कामचुकार विभागीय लेखा अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा सेवा निवृत्त कर्मचार्‍यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -