परतीच्या पावसाने वाडा तालुक्याचे सर्वाधिक नुकसान

6 कोटी 90 लाख रुपये नुकसानीचा प्रस्ताव

Most damage to Wada taluka due to return rains
परतीच्या पावसाने वाडा तालुक्याचे सर्वाधिक नुकसान

पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानीच्या पंचनाम्यात वाडा तालुक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीने तालुक्यात 14 हजार 19 हेक्टर क्षेत्रातील 10 हजार 155 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यापैकी 19 हजार 471 शेतकरी वर्गाला नुकसानीच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. भात पिके पाण्याखाली गेल्याने भात पिकांना कोंब आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांच्या दाण्याची भरपाई तुकडा पडेल की काय अशी भीती सद्या वाटू लागली आहे.

भाताची गवत पेंढी ही कुजल्याने जनावरांना चारा म्हणून खाण्यालायक राहिलेली नाही. त्याचप्रमाणे ती विकून नुकसानीचा भार हलका व्हावा म्हणून विकण्या लायकही राहिलेली नाही. अशा परिस्थितीत हवालदील झालेला शेतकरीवर्ग हा नुकसान भरपाईची याचना करीत असताना. राज्य शासनाने हेक्टरी 10 हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून जाहीर करण्यात आली आहे. यात राज्य शासनाकडे वाडा तालुक्याची नुकसान भरपाई म्हणून 6 कोटी 90 लाख रूपयांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा,वसई,तलासरी, डहाणू,विक्रमगड, वाडा या तालुक्यामध्ये वाडा तालुक्यात नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची आकडेवारी जास्त असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक के. तरकसे यांनी माहिती दिली आहे. पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने इथल्या शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भात कापणी केलेली पिके पाण्याखाली गेली होती. हवालदिल झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदारांनी जिल्ह्यातील विक्रमगड आणि वाडा पालघर या भागात आमदार निरंजन डावखरे,आमदार सुनिल भुसारा, आमदार श्रीनिवास वणगा यांनी हजेरी लावली होती.


हेही वाचा – पालघरमध्ये किसान सभेचे ठिय्या आंदोलन