निवडणुकीनंतर राज्यात सरकार बदलण्याच्या हालचाली

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा दावा

पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सरकार बदलण्याच्या हालचाली सुरू होतील, असा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. जालना येथे पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाचे विधान केले.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर येथे आले होते. जालन्यातील परतूर येथे त्यांनी पदवीधर-शिक्षकांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारच्या भवितव्यावर भाष्य केले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सरकार बदलण्याच्या हालचाली होणार असल्याचे दरेकर म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. त्याचे पडसाद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पाहायला मिळतील. या पाचही जागांवर भाजपचा विजय होईल व त्यातूनच हे सरकार जनतेला नको आहे, हेसुद्धा स्पष्ट होईल. तिथूनच खर्‍याअर्थाने सरकार बदलण्याच्या हालचाली सुरू होतील, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

आज काही राजकीय पक्षांकडून जाती पातीचा उल्लेख केला जात आहे. निवडणूक आल्या की काहींना जात आठवते. जाती जातीमध्ये भेदभाव करण्याचे काम हेतूपुरस्सरपणे केले जाते. जातीच्या नावाखाली तोडा फोडीचे राजकारण काही ठिकाणी सुरू आहे. या जातीपातीच्या भांडणात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण भाजपाने नेहमीच विकासाच्या दिशेने वाटचाल केली. त्यामुळे जे जातीचे राजकारण करीत आहेत त्यांना पदवीधर व शिक्षक मतदार यंदाच्या निवडणुकीत अद्दल घडवतील, असेही दरेकर म्हणाले.