घरमहाराष्ट्रमुंबई-गोवा महामार्ग धोकादायक !

मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक !

Subscribe

रस्ता खचल्याने अपघाताची भीती

गेल्या दहा वर्षांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असून पावसाळा सुरू होताच अनेक ठिकाणी हा मार्ग खचला असल्याने अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

तालुक्यातील रामवाडी पुलावरील महामार्गाचा जुना रस्ता पहिल्याच पावसात खचल्याचे दिसत आहे. हा रस्ता जुना असला तरी सद्य:स्थितीत याच रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. या पुलावर लोखंडी कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर साईटपट्टीवरून घसरून अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा रस्ता खचत चालला असल्याने मुसळधार पावसात या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या भागात दुचाकी घसरून अपघात होत असतात, तर दररोज या पुलावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पाऊस पडताच तयार झालेला चिखल रस्त्यावर येतो व बराचसा पट्टा चिखलमय होत आहे.

- Advertisement -

मुसळधार पावसाने या रस्त्याची कशी अवस्था होणार, याचा ट्रेलर सध्या या भागात पहावयास मिळत आहे. रामवाडी पूल ते रेल्वे स्टेशनपर्यंत खचत चाललेल्या रस्त्याची राष्ट्रीय महामार्ग विभागाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे अन्यथा या पावसाळ्यात वाहने अपघातग्रस्त होऊ शकतात, असा इशारा या मार्गावर प्रवास करणारे वाहनचालक, प्रवासी देत आहेत. पर्यायी मार्ग म्हणून उड्डाण पुलाचे काम सुरू केले असले तरी रस्त्याच्या आजूबाजूला कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. यासाठी ज्या ठिकाणी मातीचा भराव आहे त्यावर डांबर खडी टाकावी व दिशादर्शक सिग्नल बॅनर बसवावेत, खड्ड्यांची व साईटपट्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.दरम्यान, या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी योग्य ती काळजी घेतली जाईल, असे मोघम उत्तर देत अधिक भाष्य करणे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -