महापालिकेच्या वैधानिक,विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुक स्थगित

समितीचा कालावधी न वाढवल्याने निवृत्त सदस्यांना जावे लागणार बाहेर

Mumbai
mumbai municipal corporation MCGM

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती, शिक्षण समिती, बेस्ट आणि सुधार समितीसह सर्व प्रभाग आणि विशेष समित्यांच्या निवडणुका अखेर पुढे ढकलण्यात आल्या आहेत.‘करोना’ विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी नगरविकास खात्याने शुक्रवारी याबाबतचा परिपत्रक जारी करून पुढील आदेश जारी करेपर्यंत सर्व महापालिकेच्या समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात येत असल्याचे कळवले आहे.

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या सर्व समित्यांच्या सभा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत तहकूब करण्यात आल्याची पत्रक मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी प्रसिध्द केले होते. त्यामुळे महा पालिकेतील सर्व वैधानिक व विशेष समित्यांच्या बैठका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका अडचणीत आल्या होत्या. परंतु नगरविकास खात्याचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी शुक्रवारी २७ मार्च रोजी सर्व विभागीय आयुक्त, सर्व महापालिका आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांच्यासाठी परिपत्रक जारी करून कोविड १९ करोना विषाणुचे संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या स्थायी समिती तथा विशेष समितीच्या निवडणूक, सदस्य निवडणुका स्थगित करण्यात येत असल्याचे कळवले आहे. पुढील आदेशापर्यंत या निवडणुका स्थगित करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे मुंबई महापालिकेच्या ३ एप्रिल ते १७ एप्रिल २०२०च्या दरम्यान होणाऱ्या सर्व वैधानिक समित्यांच्या अध्यक्ष तसेच विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र, या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तरी सर्व समित्यांवरील निम्मे सदस्य निवृत्त झाले आहेत. त्याचा कालावधी ३१ मार्च रोजी संपुष्ठात येत असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या असल्या तरी निम्म्या सदस्यांना आपली निवड होईपर्यंत समितीच्या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या तरी समितीचा कालावधी पुढे ढकलण्यात न आल्यामुळे यासर्व निवृत्त सदस्यांना बाहेर पडावे लागणार आहे.

महापालिका चिटणीस विभागाने अशाप्रकारे जाहीर केला होता निवडणूक कार्यक्रम

वैधानिक समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका

३ एप्रिल २०२०

शिक्षण समिती व स्थायी समिती

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख : १ एप्रिल २०२०

७ एप्रिल २०२०

सुधार समिती व बेस्ट समिती

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख : ३एप्रिल २०२०

विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक

१६ एप्रिल २०२०

स्थापत्य शहर, स्थापत्य उपनगरे, सार्वजनिक आरोग्य समिती

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख : १३ एप्रिल २०२०

१७ एप्रिल २०२०

बाजार व उद्यान, विधी व महसूल आणि महिला व बाल कल्याण समिती

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख : १३ एप्रिल २०२०