कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी मुंबई महापालिका तयारीत

संभाव्य धोका लक्षात घेता ७० हजार बेड्स आणि ४०० सेंटर्सची केली सज्जता

दिवाळीनंतर मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासनातील अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी लढण्यासाठी महापालिकेची काय तयारी आहे? पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? याबाबत आढावा घेतला. मुंबईतील रुग्णालये आणि कोरोना सेंटरमधील बेड तयार आहेत. ऑक्सिजन व्हेंटिलेटर तयार ठेवण्यात आले आहेत. महापालिकेकडे औषधांचा आणि इंजेक्शनचा पुरेसा साठा आहे. तसेच महापालिकेकडे सध्या 70 हजार बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी 20 हजार बेड हे डीसीएचसीसाठी राखीव आहेत. हे बेड क्रिटिकल आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आहेत.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, सीसीसी 1 मध्ये हायरिस्क रुग्णांना तर सीसीसी 2 मध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवले जाते. यासाठी 50 हजार बेड उपलब्ध असून ते तीन टप्प्यात सुरू करण्याची तयारी आहे. सध्या मुंबईत 58 अ‍ॅक्टिव्ह कोविड सेंटर्स आहेत. त्यापैकी केवळ 10 टक्के बेड भरले आहेत. 35 सेंटर असे आहेत जे 2 दिवसांच्या नोटिसवर सुरु करता येतील, तर 400 सेंटर असे आहेत जे 8 दिवसांच्या नोटिसवर सुरू करता येतील. आवश्यकता पडल्यास ते टप्प्याटप्याने सुरु करता येतील.

काकाणी म्हणाले की, सर्व कोविड सेंटर्स, रुग्णालयांमध्ये पूर्वी सिलिडरद्वारे ऑक्सिजनपुरवठा केला जात होता. मात्र आता टर्बो फॅसिलिटीद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. सर्व जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये ओपीडी सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये कोरोनाच्या चाचण्या करून पॉझिटिव्ह रुग्णांना अ‍ॅडमिट करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. पालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असा इशारा देतानाच मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.