घरदेश-विदेशमुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यामुळे महाराष्ट्राची नाचक्की?

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यामुळे महाराष्ट्राची नाचक्की?

Subscribe

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची ओपन इन्क्वायरी आणि हायप्रोफाईल केस बनविल्यामुळे संभ्रम वाढला..

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरण मुंबई पोलिसांसह राज्य सरकारने सुरुवातीचे काही दिवस गांभीर्याने घेतले नाही. एका अभिनेत्याचा अपमृत्यू असताना ती केस हायप्रोफाईल करण्यासाठी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी खुली चौकशी (ओपन इन्क्वायरी) करण्यास मुंबई पोलिसांना भाग पाडल्यानेच मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. मागील महिन्याभरात मुंबईत तीन छोट्या पडद्यावरील अभिनेते आणि अभिनेत्रींनी त्यांच्या राहत्या घरातच आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे या तीन मृत्यूंचीही पोलीस आयुक्त परमबीर सिंह ओपन इन्क्वायरी करणार का? असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘आपलं महानगर’शी बोलताना केला.

दिशा सालियन आणि सुशांत सिंह यांच्या मृत्यूनंतर होणारी चौकशी मुंबई पोलिसांनी तात्काळ करुन न्यायालयापुढे ‘ए समरी’ रिपोर्ट दाखल का केला नाही? बॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेते, अभिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शकांना बोलावून सुशांत सिंह प्रकरण हायप्रोफाईल करण्यामागचा आयुक्त परमबीर सिंह यांचा उद्देश काय होता? असा सवालही या मंत्र्याने केला. त्यामुळे येत्या काही दिवसांत सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी न्यायालयापुढे मुंबई पोलिसांकडून ‘ए समरी’ सादर करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

सुशांतच्या मृत्यूनंतर पहिले काही दिवस मुंबई पोलीस आणि राज्य सरकारही गोंधळलेल्या अवस्थेत होते. मात्र जुलै महिन्यापासून व्हॉट्सअ‍ॅपवर काही मेसेज फिरू लागले आणि त्या मेसेजमध्ये काही जणांनी जाणूनबुजून महाविकास आघाडी सरकारमधील एका युवा मंत्र्याला टार्गेट करायला सुरुवात केली. वांद्रेतील कोणत्याही पार्टीला १३ जून रोजी कोणताही मंत्री गेलेला नसताना विरोधी पक्षाकडून नको ते घाणेरडे राजकारण सुरू झाले. मात्र, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह किंवा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी पुढे येऊन बिहारच्या पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या आरोपांना उत्तर न दिल्यानेही शिवसेनेचे अनेक मंत्री नाराज आहेत.

गेल्या आठवड्यात वर्षावर झालेल्या बैठकीतही शिवसेनेच्या एका मंत्र्याने ‘ए समरी’ रिपोर्ट कोर्टापुढे अजून सादर का केला नाही? असा सवाल महासंचालक जयस्वाल यांना करताच त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे बोट दाखवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच महासंचालक आणि आयुक्त यांच्यात विसंवाद असल्याने त्याचा फटका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला बसणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. ‘आगे आगे देखो होता है क्या…’ असे सूचक वक्तव्यही एका शिवसेनेच्या नेत्याने ‘आपलं महानगर’कडे केले.

- Advertisement -

फक्त एडीआरची नोंद

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी आतापर्यंत वांद्रे पोलिसांनी ५० दिवसांत केवळ अपघाती मृत्यू अहवालाची (ADR) नोंद केली आहे. अजूनपर्यंत एफआयआर नोंदविला नाही आणि गुन्हे अहवाल (CR) दाखल करण्यासाठी कुणी पुढेही आलेले नाही. मात्र एका बॉलिबूडच्या अभिनेत्याचा मृत्यू झाल्याने पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आदेशानंतर पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ५६ जणांची चौकशी करून त्यांचे लेखी जबाब घेतले. यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, अभिनेत्री कंगणा रानौत, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, निर्माते महेश भट्ट, यश राज फिल्मसचे चेअरमन आदित्य चोप्रा आणि धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्वा मेहतांसह सुशांत आणि रिया चक्रवर्ती यांच्या सीएचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.

दिशा सालियन आणि सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांची भूमिका आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची हलगर्जीपणाची भूमिका संपूर्ण देशाने मागील ५० दिवस पाहिली आहे. त्यामुळे सुशांत सिंह प्रकरणाचा तपास विशिष्ट टप्प्यावर येईपर्यंत आयुक्त परमबीर सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या अगोदरही भातखळकर यांनी गृहमंत्री अमित शहा यांना ट्विट करत सुशांत सिंह प्रकरणात पोलीस तपास योग्य दिशेने करीत नसून राज्य सरकारमधील युवामंत्र्याच्या दबावाखाली तपास होत असल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अशा मागणीचे पत्र लिहून खळबळ उडवली आहे.

गृहमंत्री देशमुख यांच्यावरही ठाकरे नाराज

सुशांत सिंह प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख हे दररोज चौकशीसाठी आज कुणाला बोलाविणार, आतापर्यंत किती जणांना चौकशीसाठी बोलावले याबाबतची सविस्तर माहिती टीव्ही चॅनेलला देत असत. चौकशीसाठी कुणाला बोलाविणार याबाबतची माहितीही तपास अधिकार्‍यांनी द्यायची असते, गृहमंत्र्यांनी नाही, असे नाराजीच्या सुरात बोलले जात आहे. एका अभिनेत्याच्या मृत्यूमुळे गृहमंत्र्यांनीही नकळत केसला ग्लॅमर, हायप्रोफाईल केले.

तपासातील गुप्तता भोवली?

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास अंतिम टप्यात आहे. योग्य वेळी मीडियाशी चर्चा केली जाईल असे सांगून पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी प्रत्येक वेळेस मीडियाला या प्रकरणाशी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बिहारच्या पटना शहरातील राजीवनगर पोलीस ठाण्यात सुशांतचे वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रिया चक्रवर्तीविरुद्ध भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यांच्या तपासकामी बिहार पोलिसांचे चार जणांचे एक विशेष पथक मुंबईत आले. त्यांनी तपासाला सुरुवात करुन बँक अधिकार्‍यासह इतरांची चौकशी सुरु केली. या चौकशीचा तपशील दररोज बिहार पोलिसांकडून मीडियाला मिळत होता. मात्र हीच माहिती मुंबई पोलिसांकडून मुंबईतील मीडियाच्या प्रतिनिधींना कधी देण्यात आली नाही.

थातूरमातूर उत्तर देऊन पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनीही दिवसभर कार्यालयाबाहेर उभ्या राहणार्‍या मीडियाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मूळात चौकशीचा तपशील दररोज मीडियाला दिला असता तर मुंबई पोलिसांवर ही परिस्थिती आली नसती. जे बिहार पोलिसांनी केले ते मुंबई पोलिसांना करता आले नाही. सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाची सूत्रे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी स्वत:कडे ठेवली. ही माहिती फक्त पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना देण्यात येत होती. अनेकदा अतिरिक्त पोलीस आयुक्तांनाही तपासाबाबत माहिती दिली जात नव्हती किंवा तपास अधिकार्‍यांना चौकशीदरम्यान बाजूला ठेवले जात होते, असे काही अधिकारी खाजगीत बोलतात.

शीना बोरा प्रकरणाची पुनरावृत्ती

शीना बोरा प्रकरणातही माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी मीडियाला दूर ठेवले होते. ते स्वत: जातीने तपास करीत होते. एका गुन्ह्याच्या तपासासाठी स्वत: पोलीस आयुक्त पोलीस ठाण्यात येण्याची ही मुंबई पोलीस दलातील पहिलीच वेळ होती. त्यामुळे राकेश मारिया यांच्यावर संशय घेऊन त्यांना आयुक्त पदावरुन बाजूला काढण्यात आले होते. तेच सुशांत आत्महत्येच्या तपासादरम्यान झाले. त्यामुळे वांद्रे पोलिसांच्या तपासावरच आता प्रश्नचिन्हे निर्माण झाले आहे. विरोधकांनीही हा मुद्दा वेळोवेळी मांडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच सुशांतच्या आत्महत्येनंतर परमबीर सिंह यांना मीडियाशी बोलून मुंबई पोलिसांची बाजू मांडण्याची वेळ आली होती. मात्र आता खूप उशीर झाला आहे. बिहारमध्ये दाखल झालेला गुन्हा सीबीआयकडे वर्ग झाला आहे, वांद्रे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हे निर्माण झाल्याने त्याचा वाद आता सुप्रीम कोर्टात गेला आहे. मुंबई पोलिसांवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशीच्या नावाने वांद्रे पोलिसांनी सुरू केलेली मालिका त्यांच्याच अंगाशी आल्याचे बोलले जाते.

मॅच फिक्सिंगची आठवण

आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर २०१२ साली मुंबई पोलिसात सहआयुक्त असलेल्या हिमांशू रॉय यांनी तपास केला. बुकीसोबत संबंध असल्याबद्दल विंदू दारा सिंह याला पोलिसांनी अटक केली होती. आयसीसीचे माजी अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्सचे मालक श्रीनिवास यांचा जावई गुरुनाथ मेईयप्पन याच्या अटकेतही हिमांशू रॉय यांनी महत्वाची कामगिरी केली होती. त्यावेळी मुंबई क्राईम ब्रँचने कांदिवलीत सोनू योगेंद्र जालान या बुकीला अटक केल्यानंतर बुकींशी संबंधित अनेक लिंक ओपन झाल्या होत्या. विंदू दारा सिंह, मेईयप्पन यांच्या लिंकही जालानकडूनच मिळाल्याने ही केस हायप्रोफाईल झाली होती. सुशांत सिंहची केसही अशीच मुंबई पोलिसांनी सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी हायप्रोफाईल केल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे.

ईडीकडून रियाची ९ तास चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून (अंमलबजावणी संचालनालय) शुक्रवारी कसून चौकशी करण्यात आली. ईडीच्या चार अधिकार्‍यांकडून सुमारे नऊ तास रियाची चौकशी झाली. ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित होते. रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविकसोबत ईडी कार्यालयात जाताना दिसली होती. मात्र, काही तासांच्या चौकशीनंतर शौविक ईडी कार्यालयातून बाहेर पडला. यावेळी त्याने प्रसारमाध्यांना कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. थोड्या वेळाने तो पुन्हा ईडी कार्यालयात आला. तो रियाच्या घरी गेला होता. तिथून काही महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन तो पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाला.रिया आणि शौविक यांनी काही कंपन्या स्थापन केल्या आहेत.

मात्र, या कंपन्यांचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. या कंपन्या मनी लॉन्ड्रिंगसाठी स्थापन करण्यात आल्या होत्या का? या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन होतं का? असे सवाल ईडीकडून उपस्थित करण्यात आले आहेत. त्याच कंपन्यांसंबंधित कागदपत्रे घेण्यासाठी शौविक तिच्या घरी गेला होता, अशी माहिती समोर आली आहे.

ए-समरी म्हणजे काय?

अकस्मात होणार्‍या मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद (ADR) घेतली जाते. तपास अधिकार्‍यांकडून अकस्मात मृत्यूबाबतच्या सर्व बाजू पडताळून बघितल्या जातात. तपासात अथवा चौकशीत काही संशयास्पद आढळून आल्यावर या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. आत्महत्या, बेवारस मृतदेह, तसेच नैसर्गिक मृत्यू याची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली जाते. परंतु आत्महत्या केलेल्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून त्यात आत्महत्येस जबाबदार व्यक्तीचे नाव लिहिलेले असल्यास त्यात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, आत्महत्या करणार्‍या व्यक्तीकडे कुठल्याही प्रकारची मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी अथवा काही संशयास्पद आढळून न आल्यास त्याची अपमृत्यूची नोंद केली जाते. अपमृत्यूमध्ये पोलिसांना तपासात काहीही आढळून न आल्यास तीन महिन्यात त्याचा तपास थांबवून प्रकरण बंद करण्याचा अधिकार सहाय्यक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांना असतो. तसेच मुंबई अथवा शहराबाहेरील प्रकरणात प्रांताधिकारी यांना हे अधिकारी दिलेले आहेत.

ए – समरी – चोरी, घरफोडी इत्यादी गुन्ह्यात ‘प्रथम खबर अहवाल’ (एफआयआर) दाखल करण्यात येतो. गुन्हा घडल्यानंतर आरोपी मिळून येत नसल्यास अथवा निष्पन्न होत नसल्यास किंवा आरोपी मिळण्याची शाश्वती नसते अशा गुन्ह्यात ए-समरी अहवाल न्यायालयाकडे पाठवण्यात येतो. न्यायालय या गुन्ह्यातील फिर्यादीला न्यायालयात बोलावून पोलिसांनी केलेल्या तपासात फिर्यादीचे समाधान झाले का याची माहिती घेते. फिर्यादीचे समाधान झाल्यास न्यायालयाकडून हे प्रकरण बंद करण्यात येते किंवा फिर्यादीचे पोलिसांनी केलेल्या तपासात समाधान झाले नाही तर न्यायालय या गुन्ह्यातील तपासाची दिशा ठरवून पोलिसांना त्या दिशेने तपास करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश देते.

बी-समरी – फिर्यादीने एखाद्या व्यक्तीच्या विरोधात पोलीस ठाण्यात जाणूनबुजून खोटी फिर्याद दिली असल्यास पोलीस तपासात हे उघड झाले, अथवा गैरसमजुतीतून एखादी तक्रार दाखल केली असता तपासात हे निष्पन्न झाल्यास न्यायालयात त्याचा अहवाल सादर करून हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येते त्याला बी-समरी करणे असे म्हणतात.

सी -समरी – अदखलपात्र गुन्हा (एनसी) या प्रकरणात किंवा एखादी घटना खरी पण नाही, खोटी पण नाही, अशा प्रकरणात सी-समरी केली जाते.

( इनपुट : अरुण सावरटकर आणि संतोष वाघ )

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -