दहीहंडी उत्सवाला यंदा मरगळ; गोविंदाच्या मेहनतीवर पाणी

यंदाच्या दहीहंडीचा उत्सव चुकल्या चुकल्यासारखा

Mumbai

मुंबईत गल्लीबोळातून निघणाऱ्या मोटरसायकल्स आणि वाहतूक कोंडी करणारे ट्रकच्या ट्रक भरून जाणाऱ्या गोविंदाची पथक, डीजेची धडकी भरणारा आवाज, बघ्यांच्या गर्दीचे लोट असा नेहमी दहीहंडीला असणारा माहोल आज कुठेतरी हरवल्यासारखा दिसला. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीचा उत्सव चुकल्या चुकल्यासारखा वाटला. नेहमी दहीहंडीच्या निमित्ताने असणारा जल्लोष यंदा अतिशय तुरळक ठिकाणीच पहायला मिळाला. एकुणच दहीहंडी आयोजक ढेपाळल्याने गोविंदांचा उत्सवही मरगळल्यासारखा होता.

गोविंदाची आशा ठरली फोल

दहीहंडी उत्सवातून बड्या आयोजकांची माघार, दहीहंडीच्या पारितोषिक रकमेत करण्यात आलेली घट, कोल्हापूर सांगली परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रद्द झालेला दहीहंडी उत्सव यामुळे अनेक गोविंदा पथकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. संपुर्ण वर्षभर नजर लागुन राहिलेल्या दहीहंडीच्या सणासाठी मेहनत घेतल्यानंतर यंदा पदरी घोर निराशाच पडल्याची प्रतिक्रिया गोविंदांमध्ये होती. यंदाच्या दहीहंडीच्या रकमेत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पारितोषिकांचा वर्षाव होईल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र गोविदांची ही आशा यंदा फोल ठरली. अनेक मंडळांनी दहीहंडी साजरा होण्यासाठीचा निधी हा पूरग्रस्थांना देण्याचे ठरवत दहीहंडीचे आयोजनच रद्द करत असल्याचे सांगितले.


हेही वाचा- मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला, आतापर्यंत २५ गोविंदा जखमी


वरळी, बोरिवली, गिरगाव, ठाणे अशा अनेक ठिकाणच्या आयोजकांनी यंदाच्या दहीहंडी उत्सवातून काढता पाय घेतला. त्यामुळे गोविंदा पथकांची यंदा अडचण झाली आहे. दहीहंडी समन्वय समितीने याआधीच पत्रकार परिषद घेत दहीहंडीच्या सणाचे आयोजन रद्द करू नका असे आवाहन केले आहे. जर गणेशोत्सव मंडळांकडून गणेशोत्सव साजरा होणार असेल तर दहीहंडी आयोजकांनीही साधेपणाने दहीहंडी करावी, असे आवाहन समितीकडून करण्यात आले होते.