घरCORONA UPDATEYoutube वरील कोरोना उपचाराचे व्हिडिओ काढण्याच्या पालिकेच्या पोलिसांना सूचना

Youtube वरील कोरोना उपचाराचे व्हिडिओ काढण्याच्या पालिकेच्या पोलिसांना सूचना

Subscribe

स्वागत तोडकरवरील कारवाईसाठी पालिका आक्रमक; ‘आपलं महानगर’च्या बातमीची दखल

कोरोनाची लागण होणार नाही, असा हमखास उपाय आपल्याकडे असल्याचे छातीठोकपणे स्वागत तोडकर युट्यूबच्या माध्यमातून सांगत होता. आता या बोगस डॉक्टरचे यूट्युबवरील सर्व व्हिडिओ काढून टाकण्याच्या सूचना पुणे महापालिकेने पुणे पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत. ‘आपलं महानगर’ने ‘बोगस डॉक्टर देतोय करोनाचा सामना करण्याचे सल्ले’ या मथळ्याखाली केलेल्या बातमीची दखल घेत पुणे महापालिकेने बोगस डॉक्टर स्वागत तोडकरवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे सारेच चिंतेत असताना राज्यातील बोगस डॉक्टर म्हणून अटक झालेल्या व तीन ठिकाणी गुन्हे दाखल असलेल्या स्वागत तोडकरने आपला धंदा तेजीत चालवण्याची संधीच हेरली. स्वागत तोडकर हा राज्याच्या विविध भागांमध्ये आरोग्य विषयक व्याख्याने देतो. या व्याख्यानांचे व्हिडीओ ‘मराठी डॉक्टर’ या युट्युब चॅनेलवरही प्रसारित करण्यात येतात. १४ फेब्रुवारीला झालेल्या एका व्याख्यानाचा व्हिडिओ तोडकरने युट्युब चॅनेलवर प्रसारित केला आहे. यामध्ये त्याने आपण सांगितलेला उपाय केल्यास तुम्हाला कोरोना होणार नाही, असा छातीठोक दावा केला आहे. लोकांची दिशाभूल करणार्‍या या व्हिडिओची ‘आपलं महानगर’ने बातमी केली होती. या बातमीची दखल घेत पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी पुणे महापालिकेच्या माध्यमातून पुण्याच्या सायबर क्राईम सेलला कारवाई करण्यासंदर्भात पत्र लिहिले. मात्र सायबर सेलकडून स्वागत तोडकरच्या व्हिडिओवर कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे स्वागत तोडकर हा सर्रासपणे आपला गोरसधंदा तेजीत करत आहे. नागरिकांची दिशाभूळ होऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी यासाठी अखेर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त के.वेंकटेशम यांना स्वागत तोडकर याचे कोरोना व अन्य वैद्यकीय सल्ल्यांसदर्भातील व्हिडिओ तातडीने काढण्यासाठी पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

कोण आहे स्वागत तोडकर

कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तोडकर ‘आजीबाईच्या बटव्या’तील औषधे ‘आरोग्यविषयक घरगुती उपचार’ या कार्यक्रमातून राज्यभर व्याख्याने देतो. निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर व्याख्यानांमध्ये भर असतो. कार्यक्रमाचे व्हिडिओ यू ट्यूबवर टाकून त्याने आपला व्यवसाय वाढवला आहे. तोडकरने स्वतःच्या नावासमोर डॉक्टर पदवी लावून ही दुकानदारी सुरु केली आहे. त्याच्याविरोधात कोल्हापूर, पुणे, संगमनेर येथे बोगस डॉक्टर म्हणून गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर व पुणे येथे संजीवनी निसर्ग आधार केंद्रे सुरु केली आहेत.

कोरोना उपचाराबाबत केलेला दावा

कोरोनाला घाबरून आहेत. कितीही काहीही असू द्या तुम्हाला काहीही होणार नाही. मी सांगतो ती एकच गोष्ट करायची वेखंडाची पावडर तयार करून छातीला, पाठीला, नाकाला व डोक्याला लावून झोपायचे, हा उपचार सात दिवस करायचा तुम्हाला करोनाची लागण होणार नाही.

स्वागत तोडकरविरोधात यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. आता कोरोनाच्या नावाखाली प्रतिकारशक्ती वाढविणारे औषध विकत आहेत. बीएनवायएस ही निसर्गोपचाराची अधिकृत पदवी नसण्याबरोबरच केंद्र सरकारच्या योग व निसर्गोपचार परिषदेकडे नोंदणी नाही. तरीही त्यांनी स्वतःला निसर्गोपचार तज्ज्ञ व डॉक्टर म्हणत राज्यभर जाहिरात केल्याने राज्यातील सर्व बोगस डॉक्टर शोध समितीने महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम व औषधे आणि जादूटोणा (आक्षेपार्ह जाहिरात) अधिनियम १९५४ नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे
– गणेश बोर्‍हाडे, सामाजिक कार्यकर्ता

 

स्वागत तोडकरच्या प्रकरणाबाबत सायबर सेल आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातून माहिती घेऊन योग्य ती कारवाई तातडीने करण्यात येईल.
– के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे

 

स्वागत तोडकरच्या व्याख्यानामुळे आयुर्वेदाची मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही तोडकरविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. याची प्रक्रिया लवकरच सुरू करू.
– डॉ. पवन सोनावणे, राष्ट्रीय समन्वयक, निमा संघटना

पदवी उत्तीर्ण होणारी व्यक्तीच डॉक्टर

महाराष्ट्रामध्ये कोणीही स्वत:ला तज्ज्ञ म्हणवून घेऊ शकतो. परंतु संबंधित अभ्यासक्रमाची पदवी असल्याशिवाय डॉक्टर म्हणता येत नाही. त्यामुळेच निसर्गोपचार अभ्यासक्रमाची बीएनवायएस ही पदवी उत्तीर्ण होणार्‍या व्यक्तीलाच डॉक्टर म्हटले जाते. ही पदवी नसलेली व्यक्ती ही डॉक्टर समजली जात नाही, अशी माहिती आयएनवायजीएमए या निसर्गोपचार पॅथीच्या संघटनेकडून सांगण्यात आले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -