घरताज्या घडामोडीवडिलांच्या खूनप्रकरणी मुलासह आईविरोधात खुनाचा गुन्हा

वडिलांच्या खूनप्रकरणी मुलासह आईविरोधात खुनाचा गुन्हा

Subscribe

आईला वडिलांकडून होत असलेली मारहाण यामुळे संतापलेल्या कुटुंबामध्ये झालेल्या कौटुंबिक वादातुन झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाला. यामुळे  पत्नी आणि मुलाविरोधात आश्वी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत धोंडीराम वरखडे (वय ४७) असे मृताचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील झरेकाठी गावात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

रिक्षाचालक असलेला भरत वरखडे हा नेहमी पत्नी, मुलांना शिवीगाळ आणि मारहाण करत असे. कौटुंबिक कारणावरून या कुटुंबात नेहमीच वादविवाद होत असत. शुक्रवारी रात्रीदेखील या कुटुंबात वाद झाला होता. यातून प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचले. आईला वडिलांनी काठीने मारहाण केल्याने वडिलांविरुद्धच्या संतापाचा अतिरेक झाला. पत्नी आणि मुलाने भरत वरखडे याला मारहाण केली. मारहाणीत सर्वांनी काट्यांचा आणि दगड यांचा वापर केल्याने यात भरत वरखडे याचा मृत्यू झाला.
हा प्रकार घटनास्थळापासून जाणाऱ्या अक्षय कैलास आहेर याने बघितला. त्याने तात्काळ याची माहिती गावचे पोलीस पाटील सुदाम वाणी यांना दिली. सर्व जखमींना लोणीच्या प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भरत वरखडे याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर त्यांची पत्नी मंदा वरखडे हिच्यावर उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, हवालदार संजय लाटे यांनी घटनास्थळी भेट देत या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित आणि श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनीदेखील तातडीने झरेकाठी येथे धाव घेतली होती. प्रत्यक्षदर्शी अक्षय आहेर याच्या तक्रारीवरून आश्वी पोलिसांनी मयताची पत्नी मंदा वरखडे आणि मुलगा दादासाहेब वरखडे या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दादासाहेब वरखडे याला पोलिसांनी अटक केली असून मंदा वरखडे तिच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी सायंकाळी झरेकाठी येथे मृत भरत वरखडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -