घरमहाराष्ट्रयातायाती धर्म नाही विष्णुदासा; पंढरपूरला मुस्लिम वारकऱ्यांचाही सहभाग

यातायाती धर्म नाही विष्णुदासा; पंढरपूरला मुस्लिम वारकऱ्यांचाही सहभाग

Subscribe

१९ वर्षांपासून वारी करणार्‍या बाबूमियाँ खान यांचा अनोखा प्रवास

अंतर्मनातील श्रद्धेपुढे धर्माची बंधनंही गळून पडतात. किंबहुना ज्या धर्मात जन्मलो त्याचं पालन करतानाच इतर धर्माच्या वाटेवर चालत आयुष्य अधिक प्रगल्भ करण्याचं कार्य काही व्यक्ती करत असतात. दौंड येथील बाबूमियाँ खान हेदेखील असंच एक व्यक्तिमत्त्व. यातायाती धर्म नाही विष्णुदासासंत तुकारामांच्या या ओळी जगणारे बाबूमियाँ तब्बल १९ वर्षांपासून वारीत सहभागी होत अवघ्या जगाला एकात्मतेचा संदेश देताहेत

आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीत बाबूमियाँ सहभागी झाले आहेत. ते मूळ दौंड (जि. पुणे) येथील रहिवाशी असून, सुरुवातीची १० वर्षे संत तुकारामांच्या वारीत सहभागी झाले आणि गेल्या ९ वर्षांपासून बाबूमियाँ संत ज्ञानेश्वरांच्या वारीत सहभागी होत आहेत. मनात जराही किल्मिष न ठेवता मुक्त मनाने ते वारीत जातात. बाबूमियांच्या वारीला त्यांच्या कुटुंबीयांचीही भक्कम साथ लाभते. नमाजच्या वेळेत ते असतील तेथेच नमाज पठण करतात. एकदा रमजानच्या काळातच वारी आली. तेव्हा वारीत सहभागी होत त्यांनी रोजा पाळला. तोंडी अभंग आणि मनात श्रद्धेचा गोडवा, घेऊन भक्तीच्या वाटेवरचा त्यांचा हा प्रवास जातीधर्मावरुन संघर्ष करणार्‍यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा ठरावा.

- Advertisement -

वारीत सहभागी झाल्याने आयुष्यात खूप काही शिकायला मिळालं. वेगवेगळ्या धर्माची आणि विचारांची माणसं भेटली. प्रत्येक वारीत एका ठराविक समूहात सहभागी न होता पालखीच्या वाटेवर चालता चालता वाटेत भेटणार्‍या भक्तीरसात समरस होऊन आपला प्रवास कधी संपतो तेच कळत नाही, अशा शब्दांत बाबूमियाँ आपल्या श्रद्धेचं मर्म सांगून जातात. मानवतेची शिकवण देणारे बाबूमियाँ म्हणूनच आपल्या आचरणातून अवघ्या मानवजातीसाठी एकात्मतेचा संदेश देऊन जातात!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -