‘भुजबळ संपला असं वाटलं, पण आयुष्य सिनेमासारखं झालं – छगन भुजबळ

Nashik
chhagan bhujbal
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ

“माझी मागची ५ वर्ष अत्यंत खडतर अशा परिस्थितीत गेली. या काळात भुजबळ संपला असे अनेकांना वाटले. पण पवार साहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा संधी मिळाली आणि मंत्री झालो. मागच्या पाच वर्षात अनेकांनी प्रेमाने खंबीर साथ दिली. आज ही दृश्य माझ्या आयुष्यातील एखाद्या सिनेमाप्रमाणे भासत आहेत”, अशी भावनिक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. नाशिकमधील भुजबळ फार्म येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना भुजबलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आता अपूर्ण राहिलेले कामे पुर्ण करणार असल्याचा विश्वास यावेळी भुजबळांनी बोलून दाखविला.

पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, गेले काही दिवस मुंबईत अनेक घडामोडी घडत होत्या, म्हणून नाशकात येऊ शकलो नाही. मात्र आता मंत्री म्हणून नाशिकला येणे यात वेगळेपण आहे. आघाडी सरकारच्या काळात वणीची फ्युनिक्युअर ट्रॉली, शहरात फ्लायओव्हर, गंगापूर धरणावर बोट क्लब अशी अनेक कामे केली होती. मात्र दुर्दैवाने गेल्या सरकारने बोटी हलविल्या होत्या. आता पुन्हा एकदा तिथे बोट क्लब पुन्हा सुरू करणार असल्याचे सुतोवाच भुजबळ यांनी केले.

अजितदादांना उपमुख्यमंत्री करावे, माझा विरोध नाही

ठाकरे मंत्रिमंडलाचा शपथविधी होऊन आता १२ दिवस झाले आहेत. तरिही अद्याप मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही. याबाबत दोन दिवसांत निर्णय होऊन, नागपूर हिवाळी अधिवेशनात खातेवाटप होईल, असे भुजबळ म्हणाले आहेत. त्यासोबतच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी अजितदादा उपमुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावं याला माझा विरोध नाही. मात्र हा पवार साहेबांचा अधिकार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.