भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा

J P Nadda, President of BJP
जे. पी. नड्डा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश उर्फ जे. पी. नड्डा यांची निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री व निवडणूक अधिकारी राधा मोहन सिंह यांनी जे. पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा केली. नड्डा यांची निवड बिनविरोध झाली आहे. यावेळी भाजपचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपचे इतर नेते उपस्थित होते.

भाजपच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांचे नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झाले होते. मात्र, त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी होती. अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांचे नाव चर्चेत होते; पण, त्यावेळी त्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.

आता त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यसभेचे सदस्य असलेले जे. पी. नड्डा पक्षाच्या सर्वोच्च संसदीय बोर्डचे सचिवही आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण झाला. लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन अध्यक्षपदासाठीची निवडणूक टाळली गेली. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री बनल्यामुळे जे. पी. नड्डा यांना जून महिन्यात कार्यकारी अध्यक्ष बनवले गेले. जे. पी. नड्डा मोदी सरकार-१ मध्ये आरोग्य मंत्री होते. विद्यार्थी जीवनापासून ते राजकारणात सक्रिय होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघटनेत त्यांनी वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्या. ते पहिल्यांदा १९९३ मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य बनले. नंतर ते राज्यात व केंद्रातही मंत्री बनले होते.

अध्यक्षपदासाठी खुद्द अमित शहा यांनी नड्डा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यास सहमती असल्याने नड्डा यांची निवड ही केवळ औपचारिकता उरली होती. ती पूर्ण झाली. संघटन कुशल असलेले नड्डा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व मोदींच्याही जवळचे मानले जातात. त्यांच्या निवडीत हा घटकही महत्त्वाचा ठरल्याचं बोललं जात आहे.