नागपुरात ‘मुंढे बटालियन’ करतेय कोम्बिंग ऑपरेशन

करोना नियंत्रणाचा नागपुर पॅटर्न

Mumbai
tukaram mudhe
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातली मुंढे बटालियन

लॉकडाऊनमध्ये लोक एकत नाहीत म्हणून आता लष्कराची मदत घ्यायच्या पर्यायाच विचार राज्य सरकारमार्फत होत आहे. पण करोनाविरोधात काम करण्यासाठी नागपुरातील मुंढे बटालियन आधीच सक्रीय झाली आहे. शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, होम गार्ड आणि एक डॉक्टर अशी मिनी बटालियन सध्या नागपुरातला प्रत्येक वॉर्ड स्कॅन करण्याच्या कामात गुंतली आहे. करोनाची पेशंटची कुणकुण लागली की लगेचच त्या भागात करोना संशयितांच कोबिंग ऑपरेशन सुरू करायच हेच या बटालियन काम. होय, नागपुरसारख्या शहरात करोनाचा अटकाव करण्यासाठी बटालियनने गल्लीबोळापासून ते बहुमजली इमारतीच्या सोसायट्यांमध्ये केलेली पायपीटच नागपुरकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी यशस्वी ठरत आहे. पण आता प्रश्न हाच पडतोय की नागपुरला जे शक्य झाले ते इतर बड्या शहरातील महापालिकांना का जमलेल नाही ?

नागपुरसारख्या अ वर्ग महापालिका असणाऱ्या शहरात हा मुंढे बटालियनचा पॅटर्न महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेक संकटांवर मात करत राबविला आहे. लोकांचा झालेला विरोध, असहकार आणि टीका यासारख्या प्रतिकुल वातावरणातही आता मिनी बटालियनचे काम ऑन ट्रॅक आले आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठीच हा सगळा खटाटोप आहे हे लोकांना लक्षात येऊ लागल्यानेच आता या संपुर्ण कोम्बिंग ऑपरेशनला लोकांकडून सहकार्य मिळू लागले आहे. अनेक ठिकाणी नागपुर महापालिकेतील अधिकारी तर काही ठिकाणी स्वतः तुकाराम मुंडे यांनीही लक्ष घालून करोनासाठी होणारे सर्वेक्षण का महत्वाचे आहे हे पटवून सांगितले आहे. त्यामुळेच आता नागपुरात यासाठीचा चांगला बेस तयार झाला आहे.

नागपुर शहराची प्रोफाईल

साधारणपणे २५ लाख ते २७ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुर शहरात एकुण पाच लाख ते सहा लाख घरे आहेत. शहरात महापालिकेच्या हद्दीत एकुण ३८ वॉर्ड आहेत. तर इमारतींच्या सोसायट्यांपासून ते झोपडीधारक आणि बेघर अशी संमिश्र लोकवस्ती नागपुरात आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये नागपुरातला २० टक्के इतका मोठा भाग नागपुरातील या मिनी बटालियनने व्यापून काढला आहे. तर येत्या दिवसात हेच टार्गेट १०० टक्के पुर्ण करण्याचा टीमचा मानस आहे.

मुंढे बटालियनच अस सुरू आहे काम

करोनाचा रूग्ण सापडलेल्या तीन किलोमीटरच्या परिसरात कानाकोपऱ्यातला नागपुरकर यांच्या स्कॅनरमधून सध्या सुटत नाहीए. मतदानासाठी जो डेटाबेस वापरण्यात येतो, तोच डेटाबेस हा यंदाच्या करोनाच्या सर्वेक्षणासाठीही वापरण्यात आला आहे. शिक्षक, अंगणवाडी, आशा वर्कर, होम गार्ड आणि एक डॉक्टर अशी पाच जणांची टीम प्रत्येक वॉर्डामध्ये करोनाचे संशयित शोधण्याचे काम करते. या सर्वेक्षणात शिक्षकांकडे नोंद करण्याचे काम आहे. तर अंगणवाडी आणि आशा वर्करमार्फक सर्दी, खोकला, ताप याची विचारपूस घरोघरी जाऊन केली जात आहे. एखाद्या ठिकाणी जर प्रवेशाचा मुद्दा आला तर होमगार्ड याठिकाणी मदतीला येत आहे. तर करोनाची नेमकी लक्षण तपासण्यासाठी एक अनुभवी डॉक्टर अशी टीम या बटालियनमध्ये काम करत आहे. करोनाची लक्षणे असणाऱ्या लोकांना घरगुतीच क्वारंटाईन करण्यात येत आहे. म्हणूनच करोनाच्या रूग्णांची संख्या याठिकाणी मर्यादित राहण्यात मदत झाली आहे. ज्या घरांमध्ये करोनाचे संशयित किंवा लक्षणे असलेले लोक आढळले आहेत अशा घरांना वाळीत टाकू नका असेही आवाहन करण्यात आले आहे.

आपल्याला घरीच रहायला हवय हे आम्ही लोकांना पटवून दिले आहे. म्हणूनच लोकांनी आता चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्यासाठी सुरूवात केली आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणूनच आम्ही भाजी मंडई, जीवनावश्यक सेवा सुविधा यांचे एक शिस्तीचे वेळापत्रक आखले आहे. त्यामध्ये झोपड्यांपासून ते बेघर असा कोणताही व्यक्ती अलिप्त राहणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. काही ठिकाणी प्रेमाने किंवा सक्तीने अशा उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती नागपुर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल महानगरशी बोलताना सांगितले. आमच्या कर्मचारी वर्गालाही या सर्व अत्यावश्यक सेवा असून देशहितासाठी करणे गरजेचे आहे असे आम्ही पटवून दिले आहे. डोअर टू डोअर सर्वेक्षण केल्याने नागपुरकर सुरक्षित असल्याची भावना आता लोकांमध्ये रूजू लागली आहे. लोकांनी केलेल्या सहकार्यामुळेच आम्हाला करोनाचा अटकाव करणे शक्य झाले आहे. मी नागपुरांना आवाहन करतो की असेच सहकार्य आम्हाला येत्या काळातही करावे असेही मुंढे म्हणाले.

निर्जंतुकीकरणासाठीची फवारणी, इमारतीमध्ये तपासणी आणि घरोघरी माहिती घेतल्याने हे सर्व आटोक्यात असल्याचे चित्र सध्या नागपुरात दिसत आहे. संपुर्ण निवडणुकीसाठी लागणारा डेटाबेस वापरूनच आम्ही हे सगळ शक्य केले आहे असे त्यांनी सांगितले. पण हे सगळे काम सोशल डिस्टन्सिंगनेच सुरू आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचीही तितकीच काळजी घेत आहोत हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

नागपुरला जमले ते इतर महापालिकांना का जमले नाही ?

नागपुरच्या २७ लाख लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईची लोकसंख्या ही तुलनेत दीडपट म्हणजे दीड कोटी इतरी आहे. नागपुरात ३८ वॉर्ड तर मुंबईत २२७ वॉर्ड आहेत. वॉर्डनिहाय मुंबईतही असा निवडणुकीचा डेटा वापरून अशा पद्धतीचे सर्वेक्षण कऱणे शक्य आहे. उपलब्ध डेटा आणि यंत्रणेचा वापर करून जे तुकाराम मुंडेंना जमू शकत ते इतर महापालिकांना का जमत नाही असा प्रश्न यानिमित्ताने पडतो. नागपुरदेखील अ गटातील महापालिका आहे, मग नागपुर पॅटर्नसारखा उपक्रम इतर महापालिकांना राबविणे का शक्य झाले नाही यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होतो. नागपुरवरही मुंबईसारखच संकट आहे. पण मुंबईत मात्र लोकसंख्येची घनता जास्त असतानाही अशा पद्धतीचा कोणताच उपक्रम राबविण्यात आलेला नाही. मुंबईसारख्या अ वर्ग महापालिकांनी जर अशाच पद्दतीचे सर्वेक्षण राबविले तर सध्या डोकावत असलेला करोनाच्या स्टेज ३ मधील कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका नक्कीच टाळण्यासारखा आहे.

ती ऑडिओ क्लिप खोटीच

नागपुरात २०० जणांची करोनाची चाचणीबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. पण ही क्लिप बनावट असून नागरिकांना या क्लिपवर विश्वास ठेवू नये. या क्लिपमधील माहिती खोटी आहे. माझे नागरिकांना आवाहन आहे की ही व्हायरल ऑडिओ क्लिप आणखी शेअर करू नका. आम्ही नागपुरकरांच्या सेवेसाठी अनेक गोष्टी करत आहोत. समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नका.

नागपुरातील मुंढे बटालियनचे काम असे चालते

एकुण डॉक्टर १९
एकुण टीमची संख्या २५५
आतापर्यंत सर्वेक्षण झालेली घरे ३२ हजार ८०
सर्वेक्षण सुरू असलेल्या घरांची संख्या ६४ हजार ४३६
दररोज सर्वेक्षण होणारी लोकसंख्या १ लाख ३१ हजार १३९
आतापर्यंत सर्वेक्षण झालेली लोकसंख्या २ लाख ६४ हजार ६१७