घरमहाराष्ट्रनितीन गडकरींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना आयुक्त तुकाराम मुंढेंचे उत्तर

नितीन गडकरींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना आयुक्त तुकाराम मुंढेंचे उत्तर

Subscribe

आपल्या बेधडक कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे सनदी अधिकारी आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरोप केले होते. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालकपद स्वतःकडे ठेवून मुंढे यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप करत गडकरी यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून तक्रार केली होती. यानंतर आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढत कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी आज एक पत्रकच काढले.

स्मार्ट सिटीचे संचालक पद हे नियमानुसारच माझ्याकडे ठेवले असून नागपूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांनीच या पदाचा कार्यभार सांभाळण्याचे आदेश मोबाईलवर दिले असल्याचे मुंढे यांनी सांगितले. तसेच स्मार्ट सिटीच्या कामाचे टेंडर काढण्याबाबत अध्यक्षांना अवगत केले असल्याचेही मुंढे यांनी सांगितले.

वाचा काय म्हटलंय पत्रकात –

“मी मनपा आयुक्त म्हणून २८ जानेवारी २०२० रोजी रुजू झालो. मनपा आयुक्त हे स्मार्ट सिटी (SPV) चे पदसिध्द संचालक आहेत. रामनाथ सोनावणे हे स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होते. त्यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२० रोजी या पदाचा राजीनामा श्री प्रविणसिंह परदेशी चेअरमन यांच्याकडे सुपूर्द केला.

नागपूर स्मार्टसिटीचे चेअरमन यांनी मला मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूरचा कार्यभार सांभाळण्यासाठी मोबाईलवर निर्देश दिलेत. त्यानुसार आणि शासन निर्णयानुसार आजपर्यंत मी सदर पदाचा कार्यभार सांभाळत आहे. स्मार्टसिटी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळतांना मी दैनंदिन कामकाज पार पाडीत आहे. सदर कालावधीत  ट्रान्सफर स्टेशनचे टेंडर रद्द करुन बायो मायनिंगचे टेंडर जाहीर केले होते. सदर टेंडर रद्द करताना आणि बायो मायनिंगचे टेंडर जाहीर करतांना चेअरमन यांचेशी चर्चा करूनच केलेले आहे. सदर जाहीर केलेले बायो मायनिंगचे टेंडर अजूनही अंतिम झालेले नाही. सदर दोन्ही बाबी संचालक मंडळाच्या प्रस्तावित बैठकीत ठेवण्यात येत आहे. 

त्याचबरोबर कंपनीतील कर्मचाऱ्यांचे Annual Performance Appraisal नुसार आढावा घेऊन काही कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. वरील सर्व बाबी संचालक मंडळाच्या प्रस्तावित बैठकीत ठेवण्यात येत आहे.

या काळात कार्यालयीन खर्च आणि वेतनाच्या देयकाशिवाय केवळ एकच Running Bill देण्यात आले आहे. सदर बिल (Bill) यापूर्वीच मंजूर केलेल्या कामाचे व करार झालेल्या कंत्राटदराचे, त्यांनी केलेल्या कामाचेच आहे. यामध्ये कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही.

याविषयी CEO म्हणून काम करीत असताना कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही. संचालक मंडळाची बैठक कोरोनाच्या परिस्थितीमुळे होऊ शकलेली नाही. सदर बैठक प्रस्तावित आहे.”

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून मुंढे बेकायदेशीर, असंवैधानिक काम करत असल्याची तक्रार केली होती. मुढेंनी अवैधरित्या नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालकपदाचा कार्यभार ताब्यात घेतल्याचा आरोपही या पत्रात गडकरींनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -