राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी

भाजप खासदार नारायण राणेंची राज्यपालांकडे मागणी, करोना हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी

Mumbai
narayan rane and uddhav thackeray
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे

राज्यात सातत्याने वाढत असलेल्या करोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार नारायण राणेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ठाकरे सरकार करोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारमध्ये करोना संकट हाताळण्याची क्षमता नाही. हे सरकार करोनाचा सामना करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी. राज्यातील महापालिका तसेच राज्य सरकारची रूगणालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी नारायण राणेंनी सोमवारी राज्यपालांकडे केली आहे.

राज्य सरकार करोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करू शकत नाही. या सरकारमध्ये तितकी क्षमता नाही. राज्यात आतापर्यंत हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. हे सरकार लोकांचे जीव वाचवू शकत नाही. करोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी ठरत आहे. या परिस्थितीचा विचार करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, असे, नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्याने त्यांना परिस्थिती हाताळता येत असल्याची टीकादेखील त्यांनी केली.आतापर्यंत राज्याला जे काही दिले ते केंद्र सरकारने दिले आहे. एका तोंडाने राज्य सरकार केंद्राचे कौतुक करते, दुसर्‍या तोंडाने टीका करते. हे कुठल्या प्रकारचे राजकारण आहे हे समजण्यापलिकडे आहे. या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकार्‍यांना कसे हाताळावे, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना सुरक्षित कसे ठेवावे याचा अभ्यास नाही, अशा शब्दांत राणेंनी सरकारला लक्ष्य केले.

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल काहीही चुकीचे म्हणाले नाहीत.त्यांच्यावर यांनी का टीका करायची? हे दिल्लीत जाऊन गोड बोलतात.बाहेर येऊन टीका करतात. सत्ताधार्‍यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे असल्याचे राणे म्हणाले.शरद पवार-राज्यपाल भेटीबाबत विचारले असता,त्यांच्या भेटीचे कारण आपल्याला माहिती नाही. पण राज्यपालांना कोणताही नेता भेटू शकतो, असे राणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर ते म्हणाले की,राज्य सरकारमध्ये जे मंत्री आहेत ते काँग्रेसचे नाहीत का? हे आधी त्यांनी सांगावे.एका बाजूला सत्ता भोगायची आणि सरकार आमचे नाही असे म्हणायचे हे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला योग्य दिसत नसल्याचे राणे म्हणाले.