Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महाराष्ट्र कांदा साठेबाजीवर प्रशासनाचा वॉच; व्यापाऱ्यांची तपासणी

कांदा साठेबाजीवर प्रशासनाचा वॉच; व्यापाऱ्यांची तपासणी

बाजारपेठेत अचानक कांद्याची आवक झाल्याने कांदा गेला कोठे असा प्रश्न उपस्थित राहिला असल्यामुळे आता कांदा साठेबाजीवर प्रशासन वॉच ठेवणार आहे.

Nashik
ONION

परतीच्या पावसाने लेट खरिप कांद्याचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दरात चढ उतार दिसून येत आहेत. या हंगामातील उच्चांकी दर ५ हजार ३०० रूपये हा लासलगाव बाजार समितीत नोंदविण्यात आला. तर किरकोळ बाजारात कांद्याचा दर प्रतिकिलो ७० ते ८० रुपयापर्यंत गेला आहे. बाजारात मुबलक कांदा उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बाजारात येणारा नवीन ९० टक्के कांदा हा भिजलेल्या, कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यास दर देखील मिळत नाही, अशी स्थिती आहे. मात्र, सरकारने कांद्याच्या दराबाबत चिंता व्यक्त केली असून कांद्याच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला सुचित करण्यात आले असून आतापर्यंत जिल्हयातील चार व्यापाऱ्यांकडे पथकामार्फत तपासणी करण्यात आली आहे.

बाजार समितीकडून मागवला दैनंदिन अहवाल

देशाची राजधानी दिल्लीमध्ये कांद्याचे भाव प्रतिकिलो शंभर रुपयांवर गेल्याने सर्वसामान्यांच्या घरातील आर्थिक नियोजनावर ताण येत आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यात संतुलन नसल्यानेच कांद्याची दरवाढ होत असल्याचे कारण केंद्र सरकारने दिले आहे. कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने कांदा साठवणुकीबाबत वॉच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या जो कांदा बाजारात येत आहे. हा नवीन कांदा पाण्यात भिजलेला, कुजलेला आणि ओला झालेला आहे. तसेच भिजलेला हा कांदा बाजारात येईपर्यंत पूर्णपणे खराब होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना या कांद्याचे पैसे मिळणेही कठीण झाले आहे. कांद्याचे वाढलेले भाव, अतिवृष्टीने झालेले कांद्याचे नुकसान, नविन कांदा येण्यास होणारा विलंब यामुळे निर्माण होणारी तुट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत कांद्याच्या दराला लगाम घालण्यासाठी आता कांदा साठवणुकीवरही नियंत्रयण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बाजार समितीकडून कांद्या आवक, विक्रि आणि शिल्लक साठा याबाबतचा दैनंदिन अहवाल मागविण्यात येऊन कांद्या साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

चार ठिकाणी तपासणी

दरम्यान, कांदा साठवणुकीच्या शक्यतेने जिल्हयातील कळवण, सटाणा, येवला तालुक्यातील चार व्यापाऱ्यांकडील कांदा स्टॉकची तपासणी करण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार मोठया व्यापाऱ्यांना ५०० क्विंटल तर छोट्या व्यापाऱ्यांना १०० क्विंटल साठवणुकीची परवानगी आहे. या तपासणीत फारसे काही आढळून आले नाही,याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. – गौतम बलसाने; जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने

जिल्हयातील कांदा साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खळ्यांवर जाऊन तपासणी करण्यात येत आहे. सध्या दर कमी आहेत. परंतु तरीही याबाबत प्रशासन वॉच ठेवून आहे. – सुरज मांढरे, जिल्हाधिकारी


हेही वाचा – डोंबिवली पादचारी पुलावर पुन्हा सशस्त्र हाणामारी; तिघेजण जखमी