प्रभाग समिती निवडणुकीत आघाडीचा धर्म काँग्रेस पाळणार का?

सेनेचा पाठिंंबा मनसेला; आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

पंचवार्षिक निवडणुकीत मनसेला सोबत घेऊन भाजप-सेनेच्या उमेदवारांना चारी मुंड्या चित करणार्‍या प्रभाग १३ मधील नगरसेवकांची सत्व परीक्षा गुरुवारी (दि. १५) होणार्‍या प्रभाग समितीच्या निवडणुकीत होणार आहे. पश्चिम प्रभाग समितीच्या या निवडणुकीत मनसेच्या उमेदवार अ‍ॅड. वैशाली भोसले यांना पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मात्र काँग्रेसच्या वत्सला खैरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला असून त्या आता माघार घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
येत्या १५ ऑक्टोंबर रोजी सहाही प्रभाग समिती सभापतीपदासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून निवडणूक होणार आहे. यात पश्चिम प्रभाग समितीची निवडणूक सर्वाधिक चुरशीची होणार आहे. नाशिक पश्चिम प्रभाग समितीत १२ सदस्य असून भाजपचे सर्वाधिक पाच, शिवसेना, राष्टवादी मनसे, प्रत्येकी एक तर काँग्रेसचे चार सदस्य आहेत. याठिकाणी भाजपाकडून स्वाती भामरे तर काँग्रेसकडून वत्सला खैरे यांनी अर्ज दाखल केले आहे. एकेक मतासाठी ही निवडणूक चुरशीची असल्यामुळे तसेच महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने केलेल्या गद्दारीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने मनसेच्या अ‍ॅड. वैशाली भोसले यांना चाल देत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. याठिकाणी भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा पाठींबा मिळण्याची शक्यता असली तरी काँग्रेसकडून मात्र कुरघोडी केली जात आहे. वास्तविक, काँग्रेसच्या सदस्या वत्सला खैरे या विद्यमान सभापती आहेत. त्यामुळे आता अ‍ॅड. भोसले यांना त्यांनी चाल दिल्यास भाजपच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. काँग्रेसचे सदस्य ऐनवेळी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

नाशिकरोड, सातपूरमध्येही चुरस

२३ सदस्यीय नाशिकरोड प्रभाग समितीत शिवसेना व भाजपचे समसमान ११ बलाबल आहे तर राष्टवादीचा एक सदस्य आहे. याठिकाणी भाजपाकडून मीना हंडोरे, शिवसेनेकडून जयश्री खर्जुल तर राष्ट्रवादीकडून जगदीश पवार असे तीन अर्ज दाखल झाले. येथील राष्ट्रवादीकडून पवार हे एकमेव सदस्य असल्यामुळे शिवसेनेला त्यांची मदत होणार असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे सातपूरला भाजपाचा सभापती होऊ नये यासाठी शिवसेनेने रिपाइंला चाल देत दीक्षा लोंढे यांना पाठिंबा दिला आहे. येथे मनसेचे दोन नगरसेवक असून पश्चिम मध्ये शिवसेनेने मनसेला केलेल्या मदतीचा मोबदला याठिकाणी सातपूरला घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्यांमध्ये भाजपासोबत रिपाइं असल्यामुळे त्यांची अडचण निर्माण झाली आहे. नाशिकरोड प्रभाग समिती राष्ट्रवादीच्या मदतीने घेण्याची तयारी शिवसेनेने केली असून हा भाजपासाठी धक्का ठरेल.

तीन प्रभागांत बिनविरोध निवड

सहा प्रभाग समित्यांपैकी २३ सदस्यीय पंचवटी प्रभाग समितीत भाजपचे सर्वाधिक १८ असल्यामुळे येथे शितल माळोदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. नाशिक पूर्व प्रभाग समितीत १९ सदस्य असून भाजपचे सर्वाधिक १२ असल्यामुळे येथे एडवोकेट शाम बडोदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्याचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. अशाच पद्धतीने २४ सदस्यीय नवीन नाशिक प्रभाग समितीत शिवसेनेचे १४ सदस्य असल्यामुळे शिवसेनेचे चंद्रकांत खाडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे.

बिनविरोध सभापती असे

पंचवटी : शीतल मालोदे ( भाजप)

नाशिक पुर्व : अ‍ॅड श्याम बडोदे(भाजप)

सिडको : चंद्रकांत खाडे (शिवसेना)