नितीन उपासनी प्रभारी शिक्षण उपसंचालक

NASHIK

नाशिक : नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालकपदी नितीन उपासनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपासनी हे सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव पदावर कार्यरत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांचे निलंबन केले होते. शाळेची पटसंख्या, शिक्षकांची पदमंजुरी याविषयी कोणतिही पडताळणी न करता शिक्षकांना सर्रास शालार्थ आयडी दिल्याचा ठपका बच्छाव यांच्यावर ठेवण्यात आला होता. महिन्याभरापासून हे पद रिक्त होते. उपासनी यांच्याकडे शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवसह शिक्षण उपसंचालक पदाचा पदभार देण्यात आला आहे. सोमवार (दि.30) रोजी उपासनी यांनी शिक्षण उपसंचालक म्हणून पदभार स्वीकारला. दरम्यान, रखडलेल्या शालार्थ आयडीच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे उपासनी यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षण विभागात पारदर्शी कामासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.