हैदराबाद-नाशिक-अहमदाबाद; १ फेब्रुवारीपासून हॉपिंग विमानसेवा

अनेक महिन्यांपासून नाशिककरांना अपेक्षित असलेली हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांसाठीची विमानसेवा १ फेबु्रवारीपासून हॉपिंग फ्लाईट सुरू होणार आहे. अलायन्स एअरकडून या सेवेची घोषणा करण्यात आली. त्यामुळे दिल्लीपाठोपाठ आणखी दोन मोठी शहरे नाशिकशी जोडली जाणार आहेत. ही सेवा रोज दिली जाणार आहे. त्यामुळे आयटी उद्योगास, पर्यटन आणि व्यापार उद्योगास चालना मिळणार आहे.

Nashik
nashik_airport_airport--ojhar
नाशिक विमानतळ

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत नवीन वर्षात नाशिकला देशातील सहा प्रमुख शहरांशी विमानसेवेने जोडले जाणार आहे. आता अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, बेंगळुरू, भोपाळ, हिंदण या प्रमुख शहरांसाठी नाशिककरांना सेवा मिळणार आहे. जेट एअरवेज कंपनीने नाशिक-दिल्ली-नाशिक ही सेवा १५ जूनपासून सुरू केली आहे. त्यास मोठा प्रतिसाद आहे. टू्रजेटने यापूर्वीच नाशिक अहमदाबादसाठी १३ फेब्रुवारीपासून सेवा देण्याचे घोषित केले. त्यानंतर आता अलायन्स एअरनेही नाशिक – अहमदाबाद -हैदराबाद या शहरांसाठी हॉपिंग फलाईट सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार कंपनीने या सेवेसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे काम सुरू केले आहे. बुकिंग काउंटर, स्टाफ यासह विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधांसाठी कंपनीने नियोजन सुरू केले आहे. लवकरच इतरही शहरे नाशिकशी जोडली जातील, असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.

अशी असेल सेवा

हैदराबाद येथून (फ्लाईट नं. ९१-८७१) सकाळी ६-४५ ला विमान निघेल ते ८-३० ला ओझरला पोहोचेल. त्यानंतर हेच विमान ओझरहून ८ -५५ ला अहमदाबादसाठी उड्डाण करेल. तेथे ते १०-१०ला पोहोचेल. पुन्हा ते विमान अहमदाबादहून १०-४० ला उड्डाण करून ओझरला ११-५५ ला पोहोचेल. तेथून पुन्हा १२-२० ला उड्डाण करून २-४५ ला हैदराबादला पोहोचेल. विशेष म्हणजे कंपनीकडून आठवड्यातील सातही दिवस सेवा दिली जाणार आहे. या ७० आसनी विमानात ३५ आसने उडाण योजनेअंतर्गत राखीव असतील. या आसनांसाठी सुमारे २८०० ते ३००० रुपये आकारले जातील.

आयटी उद्योगाला फायदा

दक्षिण भारतातील महत्वाचे शहर हैदराबादशी नाशिकशी जोडले गेल्याने आयटी उद्योगासह व्यापार उद्योगाला तर चालना मिळेल शिवाय पर्यटनालाही लाभदायी ठरेल. त्याचप्रमाणे अहमदाबादला हवाई सेवा कनेक्ट झाल्याने गुजरातशीही कनेक्टिव्हीटी वाढेल आणि आजचा बारा तासांचा प्रवास थेट तासाभरावर येईल. – खासदार हेमंत गोडसे