नाशिक विमानतळावरुन आठवडाभरात १,२५९ प्रवाशांची हवाईसफर

जेट एअरवेजच्या नाशिक दिल्ली विमानसेवेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता अलायन्स एअरने सुरू केलेल्या नाशिक हैदराबाद, अहमदाबाद विमानसेवेला आठवडाभरात चांगला प्रतिसाद लाभला. या दोन्ही मार्गांवर १ फेब्रुवारीपासून आतापर्यंत १२५९ प्रवाश्यांनी हवाई सफर केली. दिवसाकाठी सरासरी १५० प्रवासी दररोज नाशिक हैदराबाद, अहमदाबाद विमान प्रवास करत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. यात हैदराबाद सेवेला प्रवाशांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसुन येते.

Nashik
nashik_airport_airport--ojhar
नाशिक विमानतळ

केंद्र सरकारच्या उडाण योजनेंतर्गत दुसर्‍या टप्प्यात नाशिकहून दिल्लीसाठी १५ जूनपासून विमानसेवा सुरू झाली. या सेवेला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पुढच्या टप्प्यात अहमदाबाद, बंगरूळ, हैदराबाद, भोपाळ आणि हिंदण या सहा मोठया शहरांशी नाशिक विमानसेवेने जोडले जाणार आहे. १ फेब्रुवारीपासून नाशिकहून हैदराबाद, अहमदाबाद या शहरांदरम्यान सुरू झालेल्या हॉपिंग फ्लाइटला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अवघ्या तास-दिड तासात हा प्रवास शक्य झाला आहे. अलायन्स एअरव्दारे ही सेवा चालवली जात आहे. ७० आसनी क्षमतेच्या या विमानात ३५ आसने ही उडाण योजनेंतर्गत राखीव असल्याने दररोज साधारणपणे उडाणची तिकिटे फुल्ल असल्याचे अलायन्स एअरच्या अधिकार्‍यांनी सांगितले. अहमदाबादसाठी फारसा प्रतिसाद नसला तरी हैदराबाद सेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. या सेवेमुळे पर्यटनवृध्दीस चालना मिळणार असून आयटी उद्योगासह व्यापार उद्योगाला चालना मिळणार आहे. आठवडयातील सातही दिवस ही सेवा दिली जाते मात्र अहमदाबादसाठी रविवारी सेवा दिली जात नाही. नाशिकच्या विकासासाठी ही विमानसेवा महत्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याची प्रतिक्रिया व्यापारी, उद्योजकांकडून दिली जात आहे. एकूणच नाशिकच्या सर्वांगिण विकासाला ही सेवा हातभार लावत आहे.

दिल्लीसाठी २० हजार प्रवासी

जून २०१८ पासून नाशिक-दिल्ली विमानसेवेद्वारे जवळपास २० हजार प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. तर आगामी काळात नाशिक-गोवा, नाशिक-बेंगलोर सेवा सुरू करण्याची घोषणा काही कंपन्यांनी केली आहे.

दोन्ही मार्गांवर आठवडाभरात प्रवास करणारे प्रवासी संख्या

  • नाशिक – अहमदाबाद २७५
  • अहमदाबाद – नाशिक ३०७
  • नाशिक – हैदराबाद ३७६
  • हैदराबाद – नाशिक ३१०