रेल्वे झाली १६६ वर्षांची…

झुकूझुक.. झुकूझुक.. करत सुरू झालेली आगीनगाडी ते बुलेट ट्रेन.. असा बदल स्विकारत प्रवाशांना घेवून दिवस-रात्र २४ तास धावणारी भारतीय रेल्वे १६ एप्रिलला १६६ वर्षाची झाली असून १६७ वर्षात पदार्पण केले आहे.

Nashik

जुनेद शेख, मनमाड

झुकूझुक.. झुकूझुक.. करत सुरू झालेली आगीनगाडी ते बुलेट ट्रेन.. असा बदल स्विकारत प्रवाशांना घेवून दिवस-रात्र २४ तास धावणारी भारतीय रेल्वे १६ एप्रिलला १६६ वर्षाची झाली असून १६७ वर्षात पदार्पण केले आहे. भारतातील पहिली रेल्वे मुंबई – ठाणे मार्गावर १६ एप्रिल १८५३ ला धावली होती. मुंबईत १९२५ साली लोकलचा प्रवास सुरू होऊन हार्बरवर लाईनवर चार डब्यांची लोकल धावली. तेव्हापासून आजपर्यंत रेल्वेने सतत प्रगतीचा पल्ला गाठला असून, लाखो लोकांना रोजगार देणारी व नागरिकांसाठी सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन असलेली भारतीय रेल्वे जगात दुसर्‍या क्रमाकांची मानली जाते.

महाराष्ट्रातील थोर समाजसेवक व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक असे जगन्नाथ शंकरशेठ यांनी भारतात रेल्वे सुरू करावी, असा प्रस्ताव इंग्रजाकडे मांडला. त्यांच्या या प्रस्तावाला मान्यता देऊन १८५० ला कामाला सुरुवात झाली. मात्र, भारतात धावणारी रेल्वे मीटर गेज असावी की ब्रॉड गेज, याबाबत वाद निर्माण झाल्यावर काम थांबले. अनेक अडथळे पार करत काम पूर्ण झाल्यानंतर १६ एप्रिल १८५३ ला भारतात मुंबई- ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. ३५ किलोमीटरचे हे अंतर ४५ मिनिटात पूर्ण झाले होते. १४ डब्याच्या या पहिल्या गाडीत सुमारे ४०० प्रवाशांनी प्रवासाचा आनंद घेतला. साहिब, सिंध व सुलतान, अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी या आगगाडीला खेचले होते आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली. यानंतर मुंबई-भुसावळच्या दरम्यान रेल्वे सुरू झाली. १८५४ मध्ये बंगालमध्ये हावडा- हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. १८६४ मध्ये कोलकोता -अलाहाबाद- दिल्ली, असा लोहमार्गही पूर्ण केला गेला. १८७० साली मुंबई – कोलकोता हा ६४०० किलोमीटरचा रेल्वेमार्ग पूर्ण झाला. १८८५ मध्ये भारतीय बनावटीचे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली. कालांतराने रेल्वे पुढे-पुढे सरकत गेली आणि जाळे संपूर्ण देशभरात विस्तारले. सध्या भारतात तब्बल १ लाख १५ हजार किलेमीटरचे रेल्वे रूळ असून त्यावरून रोज १२ हजार ६१७ प्रवासी गाड्या धावतात. यातून २ कोटीपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. भारतात सुमारे १० हजारपेक्षा जास्त छोटे-मोठे रेल्वे स्थानक असून रेल्वे सुरु झाली तेव्हा डब्यात शौचालाय नव्हते. तब्बल ५ वर्षानंतर १९०९ ला शौचालाय असलेले डबे तयार केले. आज भारतात सर्वात स्वस्त फक्त रेल्वेचा प्रवास असून गोरगरिबांसाठी तर रेल्वेच एकमात्र स्वस्त साधन आहे.

लोकलची सुरुवात हार्बर लाईनवर

मुंबईत लोकलची सुरुवात १९२५ ला हार्बर लाईनवर झाली. येथे प्रथम चार डब्यांची लोकल धावली. यांनतर १९२७ मेन लाईन आणि हार्बरवर आठ डब्यांची लोकल, १९६१ मेन लाईनवर नऊ डब्यांची लोकल, १९८६ मेन लाईनवर कल्याणपर्यंत बारा डब्यांची लोकल, १९८७ कर्जतपर्यंत बारा डब्यांची लोकल, २००८ कसारापर्यंत बारा डब्यांची लोकल, २०१० ट्रान्स हार्बरवर बारा डबा लोकल, २०१२ मेन लाईनवर पंधरा डब्याची लोकल आणि आता तर लोकल सेवेत अनेक बदल झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here