विश्रामगृहाच्या लिफ्टमध्ये अडकलेले १९ भारिप कार्यकर्ते थोडक्यात बचावले

नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची शासकीय विश्रामगृहावर मोठी गर्दी झाली होती. या वेळी क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते लिफ्टमध्ये बसल्यामुळे तांत्रिक समस्या उद्भवली. उपस्थित सर्वांमध्ये एकच गोंधळ झाल्याने ही परिस्थिती लक्षात घेत बाहेर उभ्या कार्यकर्त्यांनी सळईने दरवाजा तोडून कार्यकर्त्यांना काढले बाहेर.

Nashik
Lift
कार्यकर्त्यांची सुटका झाल्यानंतर लिफ्टची पाहणी करताना अग्निशमन दलाचा कर्मचारी.

भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी आलेले १९ कार्यकर्ते रविवारी (दि. १३) दुपारच्या सुमारास लिफ्टमध्ये अडकल्याने शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी इमारतीत काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. एकाच वेळी क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते लिफ्टमध्ये गेल्याने लिफ्ट बंद पडल्याचे संबंधित तंत्रज्ञांनी सांगितले. अखेर लिफ्टचा दरवाजा तोडून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आले आणि मोठी दुर्घटना टळली.

भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या एकत्रित बहुजन आघाडीने जिल्ह्याच्या राजकारणाच्या प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भारिपचे प्रकाश आंबेडकर यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रविवारी सायंकाळी सभा होणार होती. आंबेडकर हे सकाळपासूनच विश्रामगृहाच्या तिसर्‍या मजल्यावरील खोलीत उपस्थित असल्याने त्यांना भेटण्यास येणार्‍या कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. आंबेडकर सभेला निघून गेल्यास भेट होणार नाही, या विचाराने असंख्य कार्यकर्ते एकाच वेळी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते. अशाच घाई-गर्दीत सुमारे १९ कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहाच्या लिफ्टमध्ये एकाच वेळी बसले. यातील प्रत्येकाला आंबेडकरांना भेटण्याची आतुरता असल्याने लिफ्टबाहेर निघण्यास कुणी तयार नव्हते. त्यामुळे अखेर त्यातील एकाने लिफ्टचा दरवाजा बंद केला. लिफ्ट सुरू होत नाही तोच काही क्षणात ती वर जाण्याऐवजी खाली आली. लिफ्टच्या खाली असलेल्या दोन फुट खोल पोकळीतून ती खाली आदळल्याने आतील कार्यकर्ते भयभीत झाले. लिफ्ट वर ओढली जावी यासाठी कार्यकर्त्यांनी आतूनच आरडाओरड केली. त्यामुळे लिफ्टबाहेर अन्य कार्यकर्त्यांची गर्दी झाली. परंतु दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. लिफ्टमध्ये हवा येण्यास कोणतीही जागा नसल्याने अडकलेल्यांना श्वासोच्छ्वास घेणेही अवघड होत होते. भीतीने सार्‍यांचे धाबे दणाणले.

यावेळी अग्निशमन दलाशी संपर्क साधून बोलविण्यात आले. परंतु परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बाहेर उभ्या कार्यकर्त्यांना लक्षात येताच त्यांनी लोखंडी सळईने लिफ्टचा दरवाजा उघडला. त्यानंतर अडकलेले १९ कार्यकर्ते सहीसलामत बाहेर पडले. लिफ्ट उघडण्यास आणखी वेळ लागला असता तर मोठी दुर्घटना झाली असती, असे लिफ्टमध्ये अडकलेल्या कार्यकर्त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

लिफ्टलाही क्षमता असते की !

शासकीय विश्रामगृहात नेहमीच नेते मंडळींचा वावर असल्याने राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी होते. यातील हौशी कार्यकर्ते कोणाचेही ऐकायला तयार नसतात. लिफ्टमध्ये एका वेळी केवळ आठ लोक वापर करु शकतात. मात्र क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते जर लिफ्टमध्ये प्रवेशित झाले तर लिफ्टमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होऊन ती अडकून बसण्याची शक्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनीच समजदारीची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा विश्राम गृहातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here