शहरात पहिली हायटेक पोलीस चौकी कार्यान्वित

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Nashik

भद्रकाली पोलीस ठाणे अंतर्गत नुतनीकरण करण्यात आलेल्या त्रिकोणी गार्डन हायटेक पोलीस चौकीचे उद्घाटन सोमवारी (ता.९) सायंकाळी ५ वाजता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील ही पहिली हायटेक पोलीस चौकी आहे. यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, प्रदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, संदीप वर्‍हाडे, चंदुलाल शहा आदी उपस्थित होते.

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शहरातील ६५ पोलीस चौक्या कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार काठेगल्ली परिसरातील त्रिकोणी गार्डनची हायटेक पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी एक पोलीस उपनिरीक्षक, तीन पोलीस कर्मचारी व नागरिकांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. चौकी वातानुकूलित असून परिसरातील घडामोडींवर सीसीटीव्ही कॅमेर्‍याने करडी नजर ठेवली जाणार आहे. कॅमेर्‍याने कैद केलेले फुटेज पाहण्यासाठी चौकीत एलईडी टीव्ही उपलब्ध करण्यात आला आहे. सर्व संपर्क यंत्रणा वायफायने कनेक्ट करण्यात आली आहे. चौकीच्या बाहेरील बाजूस दूरध्वनी क्रमांकाचा डिजिटल फलक लावण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here