घरताज्या घडामोडीव्यापार्‍यांकडून २ कोटी ७४ हजार शेतकर्‍यांना परत

व्यापार्‍यांकडून २ कोटी ७४ हजार शेतकर्‍यांना परत

Subscribe

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांची धडाकेबाज कारवाई

डॉ. प्रताप दिघावकर यांनी ५ सप्टेंबर रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्राचा पदभार स्विकारल्यानंतर शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांची फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार अवघ्या एक महिन्यांच्या कालावधीत द्राक्ष, कांदा, डाळींब उत्पादक शेतकरी फसवणुकीबाबत ५९३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांवर ९७ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातून तब्बल २ कोटी ७४ हजार ५८२ रुपये शेतकर्‍यांना परत मिळाले, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी तक्रारी करण्याचे आवाहन डॉ. दिघावकर यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत शेतकर्‍यांनी ईमेल, मोबाईल, प्रत्यक्ष भेटून तक्रारी डॉ. दिघावकर यांच्या मांडल्या. त्यानुसार त्यांनी संबंधित पोलीस अधिकार्‍यांना तक्रारदारांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना दिल्या. ९ सप्टेंबर रोजी शेतकरी फसवणूक व ११ सप्टेंबर रोजी सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी मोहीम सुरु केली.

- Advertisement -

डॉ. दिघावकर म्हणाले, शेतमालाचे २५ लाख काही व्यापार्‍यांनी परस्पर परत केले तर काही व्यापार्‍यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून ५५ लाख रुपये शेतकर्‍यांना परत केली. १०७ व्यापार्‍यांनी ३ कोटी २५ लाख ८८ हजार ४७४ रुपये लवकरच परत केली जाईल, असे सांगत लेखी हमी दिली. काही व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातोन ४० लाख रुपये परत देण्याची तयारी दर्शवली. असे एकूण ३ कोटी ६५ लाख ८८ हजार ४७४ रुपये शेतकर्‍यांना परत मिळाले आहेत. पत्रकार परिषदेस नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, गुन्हे शाखेचे कांतीलाल पाटील यांच्यासह जिल्ह्याभरातील शेतकरी उपस्थित होते.

फसवणूक झालेल्या तरुणांना मिळाले ३३ लाख ३३ हजार रुपये

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असून १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातून ३३ लाख ३३ हजार रुपये फसवणूक झालेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना परत मिळाली आहे. फसवणूक करणार्‍याविरोधात सातत्यपूर्ण कारवाई सुरु राहील. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांची हयगय केली जाणार नाही, असे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी सांगितले.

- Advertisement -

महिन्याभरात पोलिसांनी केलेली कारवाई

जिल्हा नाशिक ग्रामीण
तक्रार अर्ज 559
दाखल गुन्हे 92
पैसे देणारे व्यापारी 128
एकूण रक्कम 18,13,28,272

नाशिक पॅटर्न ठरणार आदर्श

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार येथील व्यापारी कांदा, द्राक्ष, डाळींब खरेदीसाठी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत देतात. शेतकरी मोठ्या विश्वासाने शेतमाल सुपूर्द करतात. त्याबदल्यात व्यापारी धनादेश शेतकर्‍यांना देतात. मात्र, बँकेकडे चौकशी केली असता धनादेश बाऊन्स झाल्याचे समजते. तोपर्यंत व्यापारी गायब झालेला असतो. शेतकर्‍यांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळावे, यासाठी नाशिक बार असोसिएशनच्या बहुतांश वकिलांनी पुढाकार घेतला आहे. धनादेश बाऊन्सप्रकरणी न्यायालयीन खटला वकील मोफत लढणार आहेत. ही भारतातील पहिलीच घटना आहे. नाशिक पॅटर्न लवकरच देशभर आदर्श ठरेल, असे डॉ. दिघावकर यांनी सांगितले.

परप्रांतीय व्यापार्‍यांवर एसआयटी करणार कारवाई

परप्रांतीय व्यापारी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर येतात. अनेक व्यापारी ओळखीचे नसतात. त्यातून फसवणुकीची दाट शक्यता असते. व्यापार्‍यांची खात्री होत नाही तोपर्यंत व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना बांधावर घेऊन जावू नये. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील संबंधित व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. दुसर्‍या टप्प्यात परप्रांतीय व्यापार्‍यांवर कारवाई करण्यासाठी एसआयटी १० टीम तयार करण्यात आली आहे. संबंधित व्यापार्‍यांची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त केली जाणार आहे, असे डॉ. दिघावकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -